शस्त्र तस्करी : खटक्यांवरील बोट स्थानिक यंत्रणांना मोठे आव्हान | पुढारी

शस्त्र तस्करी : खटक्यांवरील बोट स्थानिक यंत्रणांना मोठे आव्हान

कोल्हापूर : दिलीप भिसे : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात वाढती शस्त्र तस्करी जीवावर बेतण्याची शक्यता असतानाही आंतरराज्य तस्करांच्या गुन्हेगारी वर्तुळातील बेधडक उलाढाली धडकी भरविणार्‍या आहेत. वर्चस्व आणि दहशतीसाठी गुंडांचे खटक्यांवरील बोट स्थानिक यंत्रणांना मोठे आव्हान ठरणार आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह उपनगरामधील संघटित गुन्हेगारी संघर्षाच्या टप्प्यावर आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक अगदी तोंडावर असल्याने दोन डझनहून अधिक गुन्हेगार आतापासून गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. कोल्हापुरात तर संघटित गुन्हेगारी टोळ्यांमध्ये कोणत्याही क्षणी भडका उडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शस्त्र तस्करी ची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

शहरासह इचलकरंजी, शहापूर, चंदगड, राधानगरी, भुदरगड, आजरा, सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, जतसारख्या दुष्काळी टापूतही अलीकडच्या काळात काही तरुण गंभीर गुन्ह्यात जेरबंद झाले आहेत.

कोल्हापूर, सांगलीतून 60 शस्त्रे हस्तगत

आंध्र, बिहार, पश्‍चिम बंगालसह राजस्थान व दिल्‍ली येथील कुख्यात शस्त्र तस्करांचा पश्‍चिम महाराष्ट्रात वावर वाढला आहे. संघटित टोळ्यांना मुबलक तस्करी उपलब्ध होऊ लागली आहेत. दोन वर्षांत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 78 गुंडांना बेड्या ठोकून पोलिसांनी 60 शस्त्रे आणि काडतुसांचा साठा हस्तगत केला आहे. जिल्ह्यातही अजूनही अनेक गुंडांकडे घातक हत्यारे असावीत, असा संशय आहे.

…म्हणे म्होरक्यांचा छडा लागत नाही!

पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकण व सीमाभागात घातक शस्त्रांसह काडतुसांचा मोठा साठा पोलिसांच्या हाताला लागत आहे. पंटर गजाआड होत असताना तस्करीच्या मुळापर्यंत यंत्रणांचे हात का पोहोचत नाहीत, आजवरच्या तपासात म्होरक्यांचा छडा लावल्याचे उदाहरण अगदीच दुर्मीळ आहे. त्यामुळे शस्त्रतस्करी वाढतच चालली आहे.

म्होरक्यांचे थेट कनेक्शन!

मुंबई-पुण्यासह कर्नाटकातील अनेक संघटित टोळ्यांतील म्होरक्यांचे बिहार, उत्तर प्रदेशसह नवी दिल्‍ली येथील बड्या शस्त्र तस्करांशी थेट कनेक्शन असल्याने या साखळीतून अत्याधुनिक पद्धतीच्या शस्त्रांची उघड उघड तस्करी केली जाते. 20 हजारांपासून मिळणार्‍या शस्त्रांचा पश्‍चिम महाराष्ट्रात 70 ते 80 हजारात सौदा केला जातो.

Back to top button