कोल्हापूर ः महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता, त्या पक्षाचे जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व. तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री ज्या पक्षाचा त्या पक्षाचे महापालिकेत वजन हा आजपर्यंतचा इतिहास आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाली आहे. साहजिकच कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे वजन वाढणार आहे. कारण पालकमंत्री असलेल्या पक्षाकडे माजी नगरसेवकांचा ओढा असतो, हे वास्तव आहे. महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती की काँग्रेससोबत मैत्री हे लवकरच स्पष्ट होईल.
महापालिकेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांची एकहाती सत्ता होती. अपक्षांची मोट बांधून ताराराणी आघाडीच्या नेतृत्वाखाली महाडिक सत्तेत होते. सतेज पाटील व मंत्री मुश्रीफ यांनी महाडिक यांच्या सत्तेला सुरुंग लावला. 2010 पासून महापालिकेवर मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी आणि पाटील यांच्या काँग्रेसचा सत्तेचा झेंडा फडकत आहे. 2010-2015 या कालावधीत मुश्रीफ यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद होते. तर पाटील यांच्याकडे गृह राज्यमंत्रिपद होते. त्यामुळे महापालिकेच्या पंचवार्षिक सभागृहातही काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा होता. 77 पैकी तब्बल 31 जागा काँग्रेसचे जिंकल्या होत्या. 25 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडी असल्याने निवडणुकी नंतर अपक्षांना सोबत घेऊन जनसुराज्य-अपक्ष आघाडी झाली. त्याद्वारे जनसुराज्य आघाडीला पाच वर्षे विरोधी पक्षनेतेपद देऊन काँग्रेस-राष्ट्रवादी सत्ताधारी बनले होते.
2015-2020 च्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीनेही घवघवीत यश मिळवले. परंतु, ते सत्तेपर्यंत पोहोचू शकले नव्हते. काँग्रेस-राष्ट्रवादीने हातात घालून महापालिकेत सत्ता स्थापन केली. 2015-20 या कालावधीत काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांच्याकडे काही कालावधीसाठी पालकमंत्रिपद होते. त्यामुळे या सभागृहात राष्ट्रवादीचे संख्याबळ निम्याने घटले. तर काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या 30 झाली. राष्ट्रवादीने 14 जागा जिंकल्या होत्या. भाजप-ताराराणी आघाडीला 33 जागा मिळाल्या. भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करून चार नगरसेवक असलेल्या शिवसेनेलाही सत्तेत सहभागी करून घेतले. अशाप्रकारे राज्यात पहिल्यांदा कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची महाआघाडी अस्तित्वात आली होती.
पालकमंत्री मुश्रीफ व काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांची मैत्री जिल्ह्याला परिचित आहे. दोघेही वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी गोकुळ, जिल्हा बँक इतर सहकारी संस्थांत एकत्रित सत्तेत आहेत. महापालिकेतही 2010 सालापासून मुश्रीफ, पाटील यांची सत्ता आहे. मात्र, राजकीय समीकरणे बदलली आहेत. मुश्रीफ असलेली राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात भाजपसोबत आहे. काही वर्षांपूर्वी खा. धनंजय महाडिक यांच्याविरोधात असलेले मंत्री मुश्रीफ आता भाजपसोबत राज्यात सत्तेत आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आता मंत्री मुश्रीफ आणि खा. महाडिक एकत्र येणार का? हा चर्चेचा विषय आहे. सद्यस्थितीत मंत्री मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेस आहे. परिणामी, महापालिकेच्या राजकारणात पालकमंत्री मुश्रीफ यांचा मित्रपक्ष काँग्रेस असणार की भाजप? या चर्चेला उधान आले आहे.
जिल्ह्यात काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे सहा आमदार आहेत. राष्ट्रवादीचे फक्त दोन आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत सतेज पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपद होते. त्यातच विरोधी भाजप आणि महाडिक कुटुंबीयांकडे कोणतीच सत्ता नव्हती. साहजिकच पाटील म्हणजेच पर्यायाने काँग्रेसकडे माजी नगरसेवकांसह इच्छुकांचा ओढा होता. मात्र, आता मुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्री पद असल्याने राष्ट्रवादीला आणखी बळ मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या शिलेदारांनाही त्याचा फायदा होणार आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता मिळविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ प्रयत्नशील असणार, यात शंका नाही.