कोल्हापुरात २० मिनिटांत ११ मि.मी. पावसाचा तडाखा | पुढारी

कोल्हापुरात २० मिनिटांत ११ मि.मी. पावसाचा तडाखा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शहरात बुधवारी सायंकाळी केवळ 20 मिनिटांत तब्बल 11 मि.मी. पाऊस झाला. या पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले. मुसळधार पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. यामुळे जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. शहर परिसरालाही पावसाने झोडपले.

दुपारी साडेचार वाजता वातावरण ढगाळ झाले. काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. अवघ्या दोन-तीन मिनिटांत पावसाचा जोर इतका वाढला की, पाच-सहा फुटांवरीलही काही दिसत नव्हते. पावसामुळे अनेक मुख्य मार्गही चारचाकी व मोठी वाहने वगळता ओस पडल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी गटारी रस्त्यावरून वाहत होत्या. जयंती नाला दुथडी भरून वाहत होता.

लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, कोंडा ओळ परिसरात गटारींचे पाणी बेसमेंटमधील दुकानगाळ्यांत शिरल्याने गाळेधारकांची धावपळ उडाली. फोर्ड कॉर्नर परिसरात गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. यामुळे पादचार्‍यांसह दुचाकीस्वारांनाही मोठी कसरत करावी लागत होती. ताराबाई रोड-कणेरकरनगर, राजोपाध्ये बोळ परिसरातही गटारी तुडुंब भरून रस्त्यांवरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. परीख पुलाखालीही पाणी साचले. व्हिनस कॉर्नरवरील लक्ष्मी-नारायण मंदिरासमोर, जयंती नाला, दाभोळकर कॉर्नर, ताराराणी चौक, सीपीआर चौक आदींसह अनके रस्त्यांवरील सखल भागांत पाणी साचले.

Back to top button