Gokul Milk: 'गोकुळ'च्या तावरेवाडी चिलिंग सेंटरवर शेतकऱ्यांची जनावरांसह धडक | पुढारी

Gokul Milk: 'गोकुळ'च्या तावरेवाडी चिलिंग सेंटरवर शेतकऱ्यांची जनावरांसह धडक

चंदगड: पुढारी वृत्तसेवा : ‘दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विजय असो’, ‘गाय दूध कमी करण्याचा निर्णय मागे घेतलाच पाहिजे’, अशा घोषणा देत तावरेवाडी येथील गोकुळच्या चिलिंग सेंटरसमोर गाय दूध उत्पादकांनी आज (दि.४) मोर्चा काढून निवेदन दिले. गोकुळ दूध संघाने गाय दुधाच्या दर पत्रकामध्ये दोन रुपयांची कपात केल्याने चंदगड तालुक्यातील गाय दूध उत्पादक हवालदिल झाले आहेत. मागील दोन महिन्यांच्या कालावधीत गोकुळने गाय दुधामध्ये चार रुपयांची कपात केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे तत्काळ कपातीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा चंदगड तालुक्यात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. (Gokul Milk)

संबंधित बातम्या 

गोकुळने गाय दुधात दोन रुपयांची कपात करण्याचा व म्हैस दुधात दीड रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैस दूध खरेदी दरात वाढ केल्याने उत्पादकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, गाय दुधामध्ये दोन रुपयांची कपात केल्याने गाय दूध उत्पादक मात्र नाराज झाले आहेत.  त्यामुळे  हा दुग्ध व्यवसाय परवडत नसल्याने चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर आहे. (Gokul Milk)

नाना डसके म्हणाले की, दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न गोकुळने केला आहे. डॉक्टर सेवा, व इतर सेवा देत असताना हात आखडता घेतला आहे. यापुढे हे सहन केले जाणार नाही. ११ तारखेपर्यंत यावर योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा १२ तारखेपासून तालुकाभर आंदोलन छेडण्यात येईल. दुधाचा एकही थेंब गोकुळ दूध संघाला घालणार नाही, असा इशारा दिला. यावेळी संदीप शांताराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संजीव पाटील, सुभाष पाटील, गणपत पवार, मनोहर खणगुतकर, कुमार पाटील आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button