कोल्हापूरच्या 3 धरण क्षेत्रात अतिवृष्टी; 12 धरणांतून विसर्ग सुरू, आज ‘यलाे अलर्ट’ | पुढारी

कोल्हापूरच्या 3 धरण क्षेत्रात अतिवृष्टी; 12 धरणांतून विसर्ग सुरू, आज 'यलाे अलर्ट'

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात रविवारी परतीचा दमदार पाऊस झाला. दुपारनंतर शहरातही अनेक भागास जोरदार पावसाने झोडपून काढले. तीन धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली असून प्रमुख 15 धरणांपैकी 12 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, जिल्ह्याला सोमवारी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

कोल्हापूर शहरासह बहुतांश जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अधूनमधून हलक्या सरीही बरसत होत्या. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. सायंकाळी तर शहर आणि परिसरात काही काळ पावसाची संततधार सुरू होती. सुमारे तासभर पाऊस कोसळतच होता. पावसाने काही काळ रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. यामुळे काही ठिकाणी पाणीही साचले.

जोरदार पावसाने शहरातील जनजीवनावर परिणाम झाला. दुपारनंतर पावसाची संततधार असल्याने आठवडी बाजारावर परिणाम झाला. व्यापारी, विक्रेत्यांसह नागरिकांचीही पावसाने धांदल उडाली. अंबाबाई दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तसेच पर्यटक, प्रवाशांचीही पावसाने तारांबळ उडाली. रंकाळा चौपाटीसह शहरातील प्रमुख उद्याने, पर्यटनस्थळावर सायंकाळनंतरच्या गर्दीवर परिणाम झाला.

रविवारी सकाळी सातपर्यंत गेल्या 24 तासांत पाटगाव (105 मि.मी.), घटप्रभा (125) आणि जांबरे (145) या तीन धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. अन्य धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाला. सकाळी सातपासून दुपारी चारपर्यंत वारणा (55), कुंभी (49), पाटगाव (40) तर घटप्रभा (72 मि.मी.) या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. पाऊस असल्याने धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. परिणामी धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येत आहेत.

रविवारी दुपार चारपर्यंत जिल्ह्यात प्रमुख 15 धरणांपैकी तब्बल 12 धरणांतून विसर्ग सुरू होता. धरणातील विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रविवारी सकाळी आठपर्यंत 13.1 फुटापर्यंत खाली आलेल्या पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली. दुपारी पंचगंगेची पातळी 13.2 फूट इतकी होती. दरम्यान, रविवारी सकाळी साडेदहापर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 14.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात 44.2 मि.मी. इतका झाला. भुदरगडमध्ये 29.4, आजर्‍यात 23.3, राधानगरीत 17.2, कागलमध्ये 13.9 तर गडहिंग्लजमध्ये 13.7 मि.मी. पावसाची नोंद झाली.

तोरस्करवाडी धबधब्यात गारगोटीतील युवक बुडाला

गारगोटी, पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील तोरस्करवाडी येथील धबधब्यात गारगोटीतील युवक बुडाला. प्रणव भिकाजी कलकुटकी (वय 20) असे त्याचे नाव आहे. शोध घेऊनही तो सापडला नाही. अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली आहे.

गारगोटीतील चार युवक आज रविवारी सकाळी तोरस्करवाडी येथील धबधबा पाहण्यासाठी गेले होते. सर्वजण पाण्याचा आनंद लुटत असताना प्रणव अचानक गायब झाल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्यानंतर घाबरलेल्या मित्रांनी दीड किलोमीटर चालत येऊन तोरस्करवाडी येथील ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला. राधानगरी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

घटनेची माहिती समजताच गारगोटीतील युवकांनी थेट तोरस्करवाडी येथे धाव घेतली. माजी सरपंच अरुण शिंदे, अजित खिलारी, रणजीत बोटे यांनी पाण्यात उतरून काठीने शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा शोध लागला नाही. पावसाचा जोर आणि पाण्याच्या वाढता प्रवाह यामुळे शोध कार्यात अडथळा येत होता. रात्री अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली. कोल्हापूर येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात येणार असून सोमवारी सकाळपासून शोध मोहीम पुन्हा राबविण्यात येणार आहे.

प्रणवचे वडील गवंडी काम करत आहेत. तो इस्लामपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. गणेशचतुर्थीनिमित्त गावी आला होता. त्याच्या पाठीमागे आई-वडील व दोन बहिणी आहेत.

कोकण, सातार्‍यात मुसळधार

कोल्हापूर, पुढारी डेस्क : राज्याच्या बहुतांश भागात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. कोल्हापूर, सातार्‍यासह कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. विशेषत: कोकण आणि सातार्‍याच्या पश्चिम भागात दिवसभर जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्गात दोडामार्ग तालुक्यासह जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. समुद्रकिनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून अरबी समुद्र खवळलेला आहे. देवगड समुद्रात गेले तीन दिवस राज्यातील व परराज्यातील बोटी सुरक्षेच्या कारणास्तव उभ्या करून ठेवल्या आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात दरड व माती पाण्यामुळे रस्त्यावर आल्याने वाहतूक कोलमडली. अलिबागमध्ये वीज कोसळून बाप-लेकाचा मृत्यू झाला.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. धरणातील अतिरिक्त पाणी उद्या (2 ऑक्टोबर) तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सांगलीत संततधार

सांगली : सांगली जिल्ह्यातही रविवारी संततधार सुरू होती. सकाळपासून रात्रीपर्यंत न दमता पाऊस कोसळत होता. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. चांदोली धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला असून कोकरुड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात 24 तासांत 11 मिलिमीटर पावसासह आजअखेर 1752 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने पाणी पातळी वाढू लागली आहे. परिणामी आज दुपारी साडेतीन वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडून 1500 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सातारा पश्चिम भागात धुवाँधार

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पश्चिम भागात धुवाँधार पाऊस सुरू आहे. कराड, पाटण, वाई, जावली, महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर कायम आहे; तर फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांमध्ये दिवसभर पावसाची भुरभुर कायम होती. ऐन सुट्टीच्या कालावधीतील मुसळधारेमुळे महाबळेश्वर, पाचगणी आणि कास या पर्यटनस्थळांवर जाणार्‍या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

कराड परिसरात झालेल्या धुवाँधार पावसामुळे महामार्गाचे सर्व्हिस रस्ते पूर्ण पाण्याखाली गेले. त्यामुळे कोल्हापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक कराडजवळ ठप्प झाली होती. जितकरवाडी येथील पूलही वाहून गेला होता. त्यानंतर पुलालगत टाकलेला भराव रविवारी महापुरात वाहून गेला. त्यामुळे जितकरवाडी पुन्हा एकदा संपर्कहीन झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात नद्या दुथडी

रत्नागिरी : मागील 24 तासांपासून गार वार्‍यासह जोरदार कोसळणार्‍या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात रस्त्यावर दरड व माती आल्याने दीड तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्यातील सर्वच नद्या-नाले पुन्हा दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा राजापूर, रत्नागिरी, गुहागर व दापोली आणि मंडणगडच्या किनारी भागाला बसला. रत्नागिरीत थिबा पॅलेस परिसरात घराचे पत्रे उडाले तर झाडगाव परिसरात घरावर झाड कोसळून नुकसान झाले. बाव नदीही दुथडी भरून वाहत होती. खेड व चिपळूण तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले.

अलिबागमध्ये वीज पडून बापलेकाचा मृत्यू, एक मच्छीमार बोट गेली वाहून

अलिबाग ः कोकण किनारपट्टीवरील चक्रीवादळसद़ृश परिस्थितीचा प्रभाव रायगड जिल्ह्यात दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असून शनिवारी रात्री अलिबाग तालुक्यातील दिवलांग गावातील रघुनाथ हिराजी म्हात्रे आणि ऋषिकेश रघुनाथ म्हात्रे हे बापलेक हे जवळच्या शेतातील तळ्यावर गेले होते. यावेळी वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, उधाणाच्या भरतीनंतर अलिबाग बंदर किनार्‍यावरील एक मच्छीमार बोट वाहून केली आहे. समुद्रात वादळी वातावरण असल्याने मच्छीमारी नौका किनार्‍यावर नांगरल्या आहेत. रविवारी जिल्ह्यात महाडसह काही तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु होता.

Back to top button