कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी 44 टक्के कमी पाऊस | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी 44 टक्के कमी पाऊस

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात तब्बल 44 टक्के कमी पाऊस झाला. जिल्ह्यात यंदाही पावसाने सरासरी गाठली नाही. दि.1 जून ते दि. 30 सप्टेंबर या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 56.1 टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक पावसाचे तालुके म्हणून ओळखणार्‍या गगनबावडा, राधानगरी, चंदगड या तालुक्यांकडे पावसाने पाठच फिरवल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचे उशिरा आगमन झाले. यामुळे जूनमध्ये चिंता वाढली होती. ती चिंता जुलैमध्ये दमदार पावसाने काहींशी कमी झाली. ऑगस्टमध्येही काही प्रमाणात समाधानकारक पाऊस झाल्याने किमान सरासरी निम्मापेक्षा वर गेली.

सर्वाधिक पाऊस भुदरगड तालुक्यात

यावर्षी सर्वाधिक पाऊस भुदरगड तालुक्यात झाला. या तालुक्यात 112 टक्के पाऊस झाला. चार महिन्यांत या तालुक्यात एकूण 1456.9 मि.मी. पाऊस पडतो, यावर्षी तो 1632.4 मि.मी. इतका झाला.

सर्वात कमी पाऊस राधानगरी तालुक्यात

यावर्षी सर्वात कमी पाऊस राधानगरी तालुक्यात झाला. तालुक्यात केवळ 36.4 टक्के पाऊस झाला. चार महिन्यात 3443.6 मि.मी. पाऊस होतो. यावर्षी तो केवळ 1249 मि.मी.च पाऊस झाला.

कडगाव परिसरात 229 टक्के पाऊस

भुदरगड तालुक्यातील कडगाव परिसरात सर्वाधिक पाऊस झाला. तिथे सरासरीच्या तब्बल 229.2 टक्के पाऊस झाला. चार महिन्यात 1456.9 मि.मी. पाऊस होतो, यावर्षी तो 3338.7 मि.मी. इतका झाला.

झालेले नुकसान

जीवितहानी : व्यक्ती-1 मोठी दुधाळ जनावरे-9 लहान दुधाळ जनावरे-4, ओढकाम करणारी जनावरे-4
वित्त हानी :?पूर्णत पडलेली घरे -6, अंशत: पडलेली पक्की घरे-172, अंशत: पडलेली कच्ची घरे-486, जनावरांचे गोठे-64, सार्वजनिक मालमत्ता-13, एकूण नुकसान 1 कोटी 59 लाख 60 हजार.
स्थलांतर : (प्रशासनाकडून) कुटुंबे 175, व्यक्ती 934.

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी

100 टक्क्यांवर सरासरी

भुदरगड-112 कागल-105
90 टक्क्यांवर सरासरी

शिरोळ-93.7
80 टक्क्यांवर सरासरी

करवीर-85.2 शाहूवाडी-83.6
70 टक्क्यांवर सरासरी

हातकणंगले-79.2 गडहिंग्लज-74.4 आजरा-71.8
60 टक्क्यांवर सरासरी

पन्हाळा-68.1 गगनबावडा-63.6
50 टक्क्यांवर सरासरी

चंदगड-51
30 टक्क्यांवर सरासरी
राधानगरी-36.4

Back to top button