

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 'शाळा वाचवा – शिक्षण वाचवा', 'शिक्षणाचे खासगीकरण, कंत्राटीकरण रद्द झाले पाहिजे', 'अशैक्षणिक कामे रद्द करा'… अशा घोषणा देत हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची रस्त्यावर उतरत जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून शासनाच्या धोरणाविरोधात एल्गार पुकारला. सरकारने अन्यायकारक निर्णय मागे न घेतल्यास बेमुदत शाळा बंदचा इशारा यावेळी देण्यात आला. आ. प्रा. जयंत आसगावकर, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठचे सभाध्यक्ष एस. डी. लाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास निवेदन दिले.
राज्य शासनाने कार्पोरेट कंपन्यांना शाळा दत्तक योजना देण्याचा, सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. यास राज्यभरातून विरोध होत आहे. कोल्हापुरात 50 हून शिक्षक संघटना, पालक संघटना, कर्मचार्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. सकाळच्या सत्रात शाळेचे कामकाज पूर्ण करून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोर्चासाठी एकवटले. दुपारी 12.30 वाजता टाऊन हॉल बागेतून महामोर्चास सुरुवात झाली.
'हम सब एक है', 'आमच्या मागण्या मान्य करा – नाही तर खुर्च्या खाली करा', 'शिक्षण आमच्या हक्काचे', 'शिक्षण वाचवा – शाळा वाचवा,' अशा घोषणा व आशयाचे फलक हातात घेऊन हजारो शिक्षकांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. हात उंचावून सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात नारा दिला. सरकारी शाळा वाचवण्याचा निर्धार केला. टाऊन हॉल, सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी दोन वाजता महामोर्चाची सांगता झाली. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. भैया माने, शिक्षक नेते दादासाहेब लाड, राजाराम वरुटे, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, राजेंद्र कोरे, संतोष आयरे यांची भाषणे झाली.
आंदोलनात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, संस्थाचालक संघाचे वसंतराव देशमुख, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, सी. एम. गायकवाड, राज्य शाळा कृती समितीचे बाबा पाटील, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रसाद पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट, दिलीप माने, शिक्षक संघ थोरात गटाचे राज्य संपर्क प्रमुख एस. व्ही. पाटील, जिल्हाध्यक्ष रवी पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, शिक्षक बँकेचे अध्यक्ष सुनील एडके, विलास पिंगळे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, सुधाकर सावंत, उमेश देसाई, सुधाकर निर्मळे, शारदा वाडकर, वर्षा केनवडे आदी सहभागी झाले होते.
लोकप्रतिनिधींचा पाठिंबा
आंदोलनास काँग्रेसचे आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील यांनी पाठिंबा दिला. मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, अंकुश रानमाळे महामोर्चात सहभागी झाले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, मनसेचे पुंडलिकराव जाधव यांनी आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.