इंटरेस्ट दाखवा; पालकमंत्रिपद सोडतो : पालकमंत्री केसरकर

दीपक केसरकर
दीपक केसरकर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  देशातील प्रमुख पर्यटन केंद्रापैकी कोल्हापूर एक केंद्र व्हावे, ऐतिहाासिक महत्व असलेल्या कोल्हापूरला गतवैभव मिळावे, हाच माझा इंटरेस्ट आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना सुविधा मिळाव्या म्हणून शेतकरी संघाची जागा तात्पुरती घेतली, यामध्ये कसला आलाय इंटरेस्ट? माझा इंटरेस्ट दाखवा, मी पालकमंत्रिपद सोडतो, असे सांगत केवळ राजकारण म्हणून आरोप करू नका, ते सहन करणार नाही, अशा शब्दात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संघाच्या जागेबाबत आरोप करणार्‍यांना सुनावले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केसरकर म्हणाले, शेतकरी संघाला फेब—ुवारी महिन्यातच पत्र दिले होते, पण या सरकारी पत्राला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेतकरी संघाविषयी सरकारलाही आदर आहे, त्यालाही सरकार मदत करेल. मात्र, भाविक उन्हा-पावसात उभे राहणार असतील, तर त्यांना सुविधा दिल्या तर त्यात काय गैर आहे? भाविकांसाठी शेवटच्या क्षणी सरकारचा अधिकार वापरला, असेही त्यांनी सांगितले.

निवडणुका जवळ आल्या म्हणून प्रत्येक गोष्टीत राजकारण करणार का? असा सवाल करत अंबाबाई परिसर विकास आणि कोल्हापूरच्या पर्यटन विकासाबाबत सध्या जे जे सुरू आहे, ते यापूर्वी का केले नाही? असा सवालही त्यांनी केला. खासबाग मैदान संवर्धनासाठी निधी मंजूर केला आहे. पीएमश्री योजनेत मेन राजाराम हायस्कूलचा समावेश केला जाईल. शहरात पाच ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारली जातील. कोल्हापुरात येणार्‍या डेक्कन ओडिसीची जय्यत तयारी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण उपस्थित होते.

कोल्हापूरवर अन्याय होऊ देणार नाही

कोल्हापूर शहरात रात्री 11 नंतर सर्व व्यवहार बंद केले जातात. याबाबत विचारता कोल्हापूरचे पर्यटनद़ृष्ट्या व भौगोलिक महत्त्व खूप आहे. यामुळे कोल्हापूरवर अन्याय होऊ देणार नाही. शहरात ठराविक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत खाद्य पदार्थ मिळतील, याद़ृष्टीने गृह विभागाकडून स्वतंत्र आदेश काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news