कोल्हापूर : मिरवणूक मार्गावर ‘वॉच’ | पुढारी

कोल्हापूर : मिरवणूक मार्गावर ‘वॉच’

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अनंत चतुर्दशीनिमित्ताने गुरुवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरात कमालीची खबरदारी घेतली आहे. मिरवणूक मार्गासह प्रमुख चौकात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात येत आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. ठिकठिकाणी साध्या वेशात विशेष पोलिस पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. हुल्लडबाज, गोंधळ माजविणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. शहर व जिल्ह्यात शांतता समिती, मोहल्ला कमिटी, पोलिस मित्रांच्या संयुक्त बैठकाही घेण्यात आल्या.

असा असेल बंदोबस्त

शहरात अप्पर पोलिस अधीक्षक 1, उपअधीक्षक 8, निरीक्षक 26, सहायक, उपनिरीक्षक 95, अंमलदार 974, होमगार्ड 700, स्ट्रायकिंग फोर्स 5, आरसीपी प्लाटून 1, एसआरपीएफ प्लाटून असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

इचलकरंजीसाठी अप्पर पोलिस 1, उपअधीक्षक 4, निरीक्षक 4, सहायक, उपनिरीक्षक 28, अंमलदार 305, होमगार्ड 319, स्ट्रायकिंग फोर्स 1, आरसीसी प्लाटून 1, एसआरपीएफ 1 असा बंदोबस्त ठेवण्यात येत आहे, असे पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले.

पोलिसांची जय्यत तयारी

मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणूक मार्गावर उमा टॉकीज, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, रंकाळा कॉर्नर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर चौक येथे पोलिसांच्या वतीने टॉवर उभारण्यात येणार आहेत.

केएमटी बससेवा बंद राहणार

इराणी खणीत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. सुमारे 1200 हून अधिक कर्मचारी, वाहने व अग्निशमन दल व्यवस्था करण्यात आली आहे. धोकादायक इमारतीभोवती बॅरिकेड लावणे, फलक लावणे, इराणी खण व इतर आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे, वॉच टॉवर उभे करण्याचे काम सुरू होते. इराणी खणीवर चार क्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे. अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामग्रीसह तैनात केले आहे. या कालावधीत केएमटीची सेवा बंद राहणार आहे.

मुख्य पारंपरिक मार्ग

उमा टॉकीज चौक, सावित्रीबाई चौक, दिलबहार चौक, टेंब्ये रोड, खाँसाहेब पुतळा चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर चौक, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश चौक, रंकाळा स्टँड, जाऊळाचा गणपती चौक, राज कपूर पुतळा, इराणी खण.

समांतर मार्ग

उमा टॉकीज चौक, आझाद चौक, कॉमर्स कॉलेज, दुर्गा हॉटेल, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे पापाची तिकटी, गंगावेश,
इराणी खण.

पर्यायी मार्ग

उमा टॉकीज, फुले हॉस्पिटल, यल्लम्मा मंदिर चौक, हॉकी स्टेडियम, इंदिरासागर हॉल, सुधाकर जोशीनगर चौक, देवकर पाणंंद चौक, क्रशर चौक, इराणी खण.

Back to top button