kolhapur News | वंशाच्या दिव्यासाठी छळ; विवाहितेने जीवनयात्रा संपविली!

file photo
file photo

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पहिल्या मुलीनंतर दुसर्‍यांदाही मुलगीच जन्माला आली. त्यानंतर जणू तिच्या संसाराला द़ृष्टच लागली. वंशाला दिवा पाहिजे, या अट्टाहासापोटी तिचा मानसिक छळ सुरू झाला. तिच्या आई-वडिलांनीही सासरच्या मंडळींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण सारे प्रयत्न व्यर्थ ठरले. छळ वाढतच राहिला. जगणे असह्य झाल्याने अखेर तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्राच संपविली. अस्मिता केदारी चौगुले (वय 30, रा. कोथळी, ता. करवीर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी करवीर पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. (kolhapur News)

पहिल्या दोन्हीही मुली झाल्याने आता मुलगाच पाहिजे, यासाठी सहा वर्षांपासून अस्मिता कोंडमारा सहन करत होती. गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच रविवारी (दि. 24) रात्री उशिरा कोथळी येथे अस्मिताने राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 'तू वाजुंटी राहिली असतीस तर बरं झालं असतं,' अशा सासरच्या लोकांकडून वारंवार कानावर पडणार्‍या टोमण्यांमुळे जगणे असह्य झालेल्या अस्मिताने दोन चिमुरड्या मुलींना पोरके केले. तिने टोकाचे पाऊल उचलल्याने सार्‍यांनाच धक्का बसला. वडील दगडू सदाशिव यादव (रा. केकतवाडी, पोस्ट शिरोली दुमाला, ता. करवीर) यांच्यासह आईने हंबरडा फोडला. नातेवाईकांनी घटनास्थळ व शासकीय रुग्णालयात धाव घेतली. आक्रोशामुळे तणावही निर्माण झाला.

दगडू यादव यांनी मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जावई केदारी गणपती चौगुले, सासरे गणपती गुंडू चौगुले, सासू आनंदी गणपती चौगुले (रा. कोथळी, ता. करवीर) यांच्याविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. करवीर पोलिसांनी सोमवारी सकाळी पतीसह तिघांना अटक केली आहे. (kolhapur News)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news