Kolhapur Ganeshotsav : कोल्हापुरातील रस्ते गर्दीने फुलले | पुढारी

Kolhapur Ganeshotsav : कोल्हापुरातील रस्ते गर्दीने फुलले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  भारताची चांद्रयान-3 मोहीम… छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा इतिहास… केदारनाथ, अमरनाथ मंदिर… पुरातन आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यासाठी शहरातील सर्व रस्ते रविवारी रात्री गर्दीने फुलून गेलेे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठेतील सजीव देखावे, राजारामपुरीतील मंदिरे, शाहूपुरीतील तांत्रिक देखावे, शनिवार पेठ, जुना बुधवार पेठेतील आकर्षक गणेशमूर्तींनी जिल्हावासीयांना आकर्षित केले आहे. रविवारी शहरातील सर्वच पेठांमध्ये देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.

शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदिर प्रतिवर्षी वेगवेगळ्या मंदिरांची प्रतिकृती बनविते. यंदा या मंडळाने केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली असून याठिकाणी सायंकाळी 7 नंतर गर्दी दिसून आली. त्रिमूर्ती मित्र मंडळाचा वृद्धाश्रमावर आधारित देखावा, शाहूपुरी युवक मित्र मंडळाचा भारतीय चांद्रयान मोहीम तांत्रिक देखावा लक्षवेधी ठरला आहे.

ऐतिहासिक देखाव्यांची परंपरा

शिवाजी पेठ आणि मंगळवार पेठेने यंदाही सजीव देखाव्यांमध्ये ऐतिहासिक विषयांना महत्त्व दिले आहे. रंकाळा टॉवर येथील कै. उमेश कांदेकर युवा मंचचा ‘विशाळगड कथा, गाथा आणि व्यथा’ हा देखावा विचार करायला भाग पाडतो. ताराबाई रोडवरील मित्रप्रेमचा छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित देखावा, गोल्ड स्टार स्पोर्टस्चा पावनखिंड हा ऐतिहासिक देखावाही गर्दी खेचत आहे. मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाचा सरखेल कान्होजी आंग्रे सजीव देखावाही चर्चेचा विषय ठरला आहे. यासोबतच प्रिन्स क्लबचा मुलांच्या आत्महत्येसंदर्भात चिंतनात्मक देखावा, कलकल ग्रुप, ब्लड ग्रुप, पद्मावती मंडळाच्या आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यासाठी गर्दी होती.

राजारामपुरीला यात्रेचे स्वरूप

राजारामपुरीतील शहीद भगतसिंग तरुण मंडळाची चिंतामणी गणेशमूर्ती, शिवाजी तरुण मंडळाची छत्रपती शिवरायांची भव्य प्रतिमा, तांडवनृत्य, गणेश तरुण मंडळ 21 फुटी गणेशमूर्ती पाहण्यासाठी गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत नेटके नियोजन करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. तसेच मध्यभागी बॅरिकेडिंग उभारण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या रस्त्याला यात्रेचे रूप आले आहे.

आकर्षक गणेशमूर्तींची चर्चा

जुना बुधवार पेठ, शनिवार पेठेतील विविध मंडळांच्या गणेशमूर्ती आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत. म्हसोबा-बिरोबा देवालय ट्रस्टची शेतकरी राजा रूपातील गणेशमूर्ती, नरसोबा सेवा मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, गिरणी कॉर्नर मित्र मंडळ, द्विमुखी मारुती मंदिर तोरस्कर चौक यांच्या गणेशमूर्ती पाहण्यास गर्दी होती. दसरा चौक, लक्ष्मीपुरी, रविवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, गंगावेश, महाद्वार रोड परिसरातही गणेशमूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होती.

प्रसाद, चहाची व्यवस्था

शहरातील गणेश मंडळांच्या वतीने देखावे पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांसाठी प्रसाद, खिचडीचे वाटप करण्यात येत होते. तसेच चहाचीही व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली. सायंकाळनंतर देखावे पाहण्यासाठी ग्रामीण भागातूनही ग्रामस्थ दाखल होतात. अशा सर्वांना या प्रसादाचा आधार मिळाला.

Back to top button