कुरूंदवाड येथे गौरी-गणपती विसर्जनाला सुरूवात; मूर्ती, निर्माल्‍य दान उपक्रमाला प्रतिसाद | पुढारी

कुरूंदवाड येथे गौरी-गणपती विसर्जनाला सुरूवात; मूर्ती, निर्माल्‍य दान उपक्रमाला प्रतिसाद

कुरुंदवाड ; पुढारी वृत्तसेवा गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…चा जयघोष करत जड अंत:करणाने कुरुंदवाड नगरीत पाच दिवसांच्या घरगुती गणपती व गौरीच्या विसर्जनाला सुरवात झाली आहे. दरम्यान पालिका प्रशासनाच्या आवाहनानुसार मूर्ती व निर्माल्य दान उपक्रमाला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत.

गेल्या पाच दिवसांपासून भक्तिमय वातावरणात घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली होती. गेले पाच दिवस पूजा,अर्चना, आरती अशा भक्‍तीमय वातावरणात श्री गणेश भक्‍तीत सर्व कुटुंब लीन झाले होते. यावेळी विश्वशांतीसाठी प्रार्थनाही करण्यात आली. आज (शनिवार) पाचव्या दिवशी गणपतीसह गौरीचे विसर्जन करण्यात येत आहे.सकाळपासून घरगुती गणपतीचे पूजन करून निरोप देण्यात भक्तगण गुंतले आहेत. पालिकेतर्फे शहरात सन्मित्र चौक, पालिका चौक, शिवतीर्थ चौक व भैरववाडी आदी ठिकाणी गणेश विसर्जन कुंड, काहिली व निर्माल्य कुंडची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालिका प्रशासनाने तयार केलेल्या कृत्रिम जलकुंडात मूर्ती विसर्जित करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. श्री मूर्ती दान करून काही भक्तांनी ‘पंचगंगा बचावासाठी’ खारीचा वाटा उचलला आहे, तर पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण पाहता विसर्जनाच्या ठिकाणी प्रशासनाकडून जलकुंभ उभारण्यात आले आहेत. नागरिकांनी जबाबदारी ओळखून निर्माल्य नदीत विसर्जित न करता निर्माल्यकुंभात एकत्रित दान करावा. या कृतीतून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा ‍करावा असे पालिका कर्मचारी आवाहन करत आहेत.

विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने शहरातील वाहतूक बाह्य मार्गावरून वळवली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक व गणेश विसर्जन सुरळीत सुरू होणार आहे. त्यामुळे भाविकांची तसेच विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सपोनि रविराज फडणीस यांनी चोक आराखडा तयार करून बंदोबस्त लावला आहे. पालिकेने दान केलेल्या गणेशमूर्ती पालिकेच्या वतीने एकत्र करून सरकारी विहिरीत विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button