पाच वर्षांत कोल्हापूर होणार गगनचुंबी इमारतींचे शहर

file photo
file photo

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोरोनामध्ये बसलेल्या धक्क्यातून कोल्हापूरचे गृहनिर्माण क्षेत्र सावरत असून कोल्हापुरातील रियल इस्टेट मार्केटमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. कोटींची उड्डाणे घेणार्‍या मार्केटमध्ये मागणीमध्येही मोठी वाढ आहे. या क्षेत्राचा संपूर्ण कायापालट झाला असून कोल्हापूरचे गृहनिर्माण क्षेत्र बदलत्या जीवनशैलीला प्रतिसाद देताना दिसत आहे. उंच इमारतींना परवानगी मिळाली असून पुढील पाच वर्षांत शहराची स्कायलाईन पूर्णपणे बदलणार असल्याचा विश्वास बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दै.'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला.

कोल्हापूर महानगरपालिकेने 2016 मध्ये नवीन विकास नियमावली स्वीकारल्यानंतर बांधकाम क्षेत्राला मोठी चालना मिळाली. नव्या नियमानुसार बांधकामासाठी भरभरून एफएसआय देण्यात आला. त्यानुसार शहरात अनेक उंच इमारतींना बांधकाम परवाने मिळाले. ही बांधकामे पूर्ण झाल्यानंतर शहरात सुमारे 45 लाख स्क्वेअर फूट बांधकाम उपलब्ध होणार आहे. उच्चभ्रू परिसरातील उंच इमारती ही लवकरच कोल्हापूरची ओळख होणार आहे.

गेल्या 10 वर्षांत जमिनीच्या दरात मोठे बदल झाले. कोल्हापुरात 2007 मध्ये फ्लॅटच्या किमती सुमारे 1800 ते 2200 रुपये प्रतिचौरस फूट होत्या. 2011 पर्यंत हा दर 2000 ते 2800 रुपयांपर्यंत गेला. 2014 मध्ये हा दर 3500 ते 4500 रुपये झाला. 2020 पर्यंत दर जवळजवळ स्थिर होते. त्यानंतर दरामध्ये वाढ झाली आहे.

हायराईजला पसंती

2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे कोल्हापूरकरांची मानसिकता बदलत आहे. पूरबाधित क्षेत्रात असलेल्या बंगलेधारकांकडून या पुराने प्रभावित न होणार्‍या क्षेत्रातील उंच इमारतीमध्ये सदनिका खरेदीला पसंती दिली जात आहे. पूर्वी बंगले धारकांची फ्लॅट संस्कृती स्वीकारायची तयारी नव्हती. महापुरामध्ये कोल्हापूरकरांच्या मानसिकतेत बदल होत असल्याचे निरीक्षण जाणकारांनी नोंदवले आहे.

सध्याच्या कोल्हापुरातील प्रॉपर्टी बाजाराचे ढोबळ वर्गीकरण

  • सर्कल 1 : शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क टाकाळा, प्रतिभानगर, राजारामपुरी-
    प्रतिचौरस फूट दर 7 ते 10 हजार
  • सर्कल 2  : कदमवाडी, कारंडे मळा, जाधववाडी, सानेगुरुजी वसाहत, हॉकी स्टेडियम, दुधाळी, कसबा बावडा-प्रतिचौरस फूट 4 ते 6 हजार रुपये
  • सर्कल 3 : फुलेवाडी, उजळाईवाडी, आर. के. नगर, साळोखेनगर, कळंबा, पाचगाव – प्रति चौरस फूट दर 3000 ते 4000 हजार

गडहिंग्लज, शिरोळ, हुपरी, हातकणंगले, इचलकरंजी तसेच पुणे-मुंबईत राहणार्‍या मूळच्या कोल्हापूरच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर कोल्हापुरात सदनिकांची मागणी आहे. सावंतवाडी, सिंधुदुर्ग, कणकवली या भागातील लोकांकडून मुलांच्या शिक्षणाची सोय म्हणून आणि निवृत्तीनंतर सेटल होण्यासाठी कोल्हापुरात घर खरेदीला पसंती दिली जाते.
– सचिन ओसवाल उपाध्यक्ष क्रिडाई

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news