

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणार्या दिवाळी पाडव्याला ऑटोमोबाईल, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, स्मार्ट फोन खरेदीची जिल्ह्यातील बाजारपेठेत 800 ते 1000 कोटींची उलाढाल झाली. व्यापारी, व्यावसायिकांनी कॅशबॅक ऑफर्स व डिस्काऊंटची बरसात केल्याने बाजारपेठेत नवचैतन्य होते. खरेदीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाजारपेठ सुरू करीत त्यांना चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे बाजारपेठेत दसर्यापासून नवचैतन्याचे वातावरण आहे. आता बाजारपेठ पूर्वपदावर आली आहे. दिवाळी पाडव्याची बाजारपेठेत कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याने व्यापारी, व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर शहर व जिल्ह्यात अनेकांनी गृहप्रवेश केले. कोरोनामुळे गेल्या वर्षी बांधकाम व्यवसायात गुंतवणूक नव्हती. यावर्षी मात्र ग्राहकांचा कल पुन्हा वाढला आहे. दिवाळी पाडव्याला 60 ते 70 घरे, दुकाने यासह प्लॉटचे बुकिंग झाले आहे. घरांना यंदा चांगली मागणी वाढली असून 50 कोटीहून अधिकचा व्यवसाय झाल्याचे 'क्रेडाई'चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी सांगितले.
दसर्यापासून ऑटोमोबाईल क्षेत्राने मोठी उभारी घेतली आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हजारो दुचाकी व चारचाकी वाहनांची डिलिव्हरी करण्यात आली. यंदा चारचाकी वाहनांना सुमारे एक वर्ष वेटिंग आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीस मोठा प्रतिसाद दिसून आला.
सोन्याच्या किमती ऐन दिवाळीत कमी झाल्याने ग्राहकांमध्ये मोठा उत्साह होता. पाडवा व भाऊबीज या दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. यंदा सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तूंना मागणी होती. यावर्षी सोने-चांदीची सुमारे 20 कोटींची उलाढाल झाल्याचे कोल्हापूर सराफ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सांगितले.
मागील वर्षी दिवाळीत कोरोनामुळे म्हणावा तसा कापड व्यवसाय झाला नव्हता. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत कापड व्यावसायिकांनी डिस्काऊंट ऑफर दिल्याने ग्राहकांनी खरेदी केली. दिवाळी पाडव्याला सूटिंग-शर्टिंगपेक्षा रेडिमेड कपडे, किडस् वेअर, साड्यांची खरेदी बर्यापैकी झाली. 22 नोव्हेंबरनंतर लग्नसराई असल्याने कापड व्यवसायाची उलाढाल वाढेल अशी अपेक्षा कोल्हापूर कापड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संपत पाटील यांनी व्यक्त केली.
इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी वेगवेगळ्या बंपर ऑफर्स जाहीर केल्याने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व साहित्य खरेदीसाठी दिवाळी पाडवा तेजीत होता. 55 इंची एलईडी टीव्ही, वॉशिग मशिन, फ्रीजला सर्वाधिक मागणी होती. लॅपटॉपसह मोबाईल अक्सेसरीजची खरेदीही वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी जास्त व्यवसाय झाल्याचे असल्याचे अश्विन केशवानी यांनी सांगितले.
कोरोना व पेट्रोल-डिझेल इंधनाचे दर वाढल्याने मध्यमवर्गीयांपासून अनेक जणांनी सायकल वापरणे पसंत केले आहे. दिवाळी पाडव्याला छोट्या-मोठ्या सायकलसह इलेक्ट्रिक सायकलची मागणी वाढली. गतवर्षाच्या तुलनेत 25 टक्क्यांनी व्यवसाय वाढल्याचे सायकल विक्रेते अनुप परमाळे यांनी सांगितले.
यंदा तयार फराळाची मागणी 20 टक्के वाढली. करंजी, चकली, अनारसे, बुंदी कळी यासह गिफ्ट बॉक्सलाही मागणी होती. काही व्यावसायिकांनी सातासमुद्रापार फराळाचे पदार्थ कुरिअरने पाठविले आहेत. फराळाच्या पदार्थांची माहिती सोशल मीडियावर अपलोड करून व्यावसायिकांनी ऑर्डर मिळविल्याचे फराळ उत्पादक सूर्यकांत वडगावकर यांनी सांगितले.