

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दामदुप्पट परताव्याच्या बहाण्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह सात राज्यांतील १ लाख ८५ हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे ३ हजार कोटीची फसवणूक करून नोव्हेंबर २०२२ पासून फरार झालेल्या बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्स व संलग्न विविध कंपन्यांचा सर्वेसर्वा तथा मॅनेजिंग डायरेक्टर लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (वय ३५, रा. किर्लोस्करवाडी रोड पलूस, जि. सांगली) याला कोल्हापूर पोलिसांनी आज (दि.१८) पहाटे अटक केली. संशयित ११ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता.
संशयिताच्या घटस्फोटीत पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेवून आर्थिक गुन्हे शाखेने तिच्याकडून ५० लाखाचे दागिने हस्तगत केल्यानंतर म्होरक्या सुभेदारच्या अडचणी वाढल्या होत्या. पोलिसांना चकवा देणाऱ्या म्होरक्याचा काही दिवसांपासून कोल्हापूर परिसरात वावर वाढला होता. आज पहाटे पुणे- बंगळूर महामार्गावर त्याच्या वास्तव्याचा ठावठिकाणा समजताच विशेष पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडील अलिशान मोटारही पथकाने हस्तगत केली आहे.
लोहितसिंग सुभेदारच्या अटकेबाबत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दुजोरा दिला. याबाबतची अधिकृत माहिती बुधवारी ( दि. २० ) देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. सुभेदारच्या अटकेबाबत तपास यंत्रणेने दुपारपर्यंत कमालीची गोपनियता पाळली होती. सायंकाळनंतर संशयिताच्या अटकेचे वृत्त शहर, जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रासह अन्य राज्यात वाऱ्यासारखे पसरले. कोट्यवधीच्या फसवणूक झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी सायंकाळनंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यांसह आर्थिक गुन्हे शाखेसमाेर गर्दी केली होती.
लोहितसिंग सुभेदारसह संचालकांनी शाहूपुरी येथील दुसऱ्या गल्लीत चंद्रगंगा अपार्टमेंटमध्ये ए. एस.ट्रेडिंग ॲण्ड डेव्हलपर्स ( एल.एल.पी) कंपनीचे कार्यालय थाटले होते.कंपनीशी सलग्न शहरातील मध्यवर्ती परिसरात विविध शाखाही थाटल्या होत्या. कमी काळात दामदुप्पट कमाईची भुरळ घालून महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह सात राज्यातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.
हेही वाचा :