कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या रांगड्या मराठमोळ्या संस्कृतीतील महत्त्वाचा सण म्हणून गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2023) अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे विघ्नहर्त्या गणरायाच्या उत्सवाची प्रतीक्षा आबालवृद्धांना वर्षभर लागून असते. यंदाच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा संपली असून, मंगलमय सोहळ्यास मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. लाडक्या गणरायाचे आगमन गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर होणार असून, या मंगलमय सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघी करवीरनगरी सज्ज झाली आहे.
महिनाभरापासूनच सार्वजनिक तरुण मंडळांची लगबग सुरू आहे. गणेश चतुर्थीच्या (Ganeshotsav 2023) पूर्वसंध्येला सोमवारी दिवसभर अनके सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे आगमन झाले. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून बरसणार्या पावसाच्या जोरदार सरी झेलत बाप्पांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात आणि लेसर शोच्या झगमगाटात गणेश आगमनाच्या मिरवणुका सुरू होत्या. रस्त्यांवरील खड्ड्यांतून वाट काढत अनेकांनी बाप्पांना वाजत-गाजत घरी नेले. गतवर्षीप्रमाणेच यंदाचा गणेशोत्सवही 10 दिवसांचा असून, हा सोहळा साजरा करण्यासाठीची जय्यत तयारी मंडळांकडून करण्यात आली आहे. आगमनाबरोबरच विसर्जन मिरवणुका धुमधडाक्यात काढण्याचे नियोजन गणेश भक्तांनी केले आहे.
गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठीही बाजारपेठांमध्ये सोमवारी दिवसभर मोठी गर्दी होती. दरम्यान, खड्डे बुजविण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू होते. यात पुन्हा दिवसभर पावसाची भर होतीच. याशिवाय शहरातील बहुतांशी रस्त्यांवर गणेश मंडळांचे मंडप उभारण्यात आल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, गंगावेस कुंभार गल्ली, पापाची तिकटी, पानलाईन, महाद्वार रोड, राजारामपुरीसह बहुतांशी मार्गांवर दिवसभर गर्दी झाली होती.
दरम्यान, करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या वतीने 133 व्या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी याची सुरुवात गणेश आगमन मिरवणुकीने झाली. पापाची तिकटी येथील पारंपरिक कुंभार कुटुंबीयांनी तयार केलेली शाडूची गणेशमूर्ती सायंकाळी रथातून ओढत अंबाबाई मंदिरापर्यंत नेण्यात आली. गणेशाची प्रतिष्ठापना गरुड मंडपात मंगळवारी सकाळी 7 वाजता, उद्योजक नितीन वाडीकर व सौ. मनीषा वाडीकर यांच्या हस्ते होणार आहे; तर सकाळी 11 वाजता सजावटीचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असून, यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले आहे.