

धामोड, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील कोळप येथून राधानगरीकडे येत असताना धामोड (ता. राधानगरी) येथील तरुणांच्या मोटारीला झालेल्या अपघातात अजित चंद्रकांत धनवडे (वय 38, रा. धामोड) या मेकॅनिकचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ऐन गणपती सणाच्या तोंडावर झालेल्या या अपघातामुळे धामोड परिसरावर शोककळा पसरली आहे.
जुना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी संतोष सोणवने याच्यासह अजित धनवडे, उमेश मराठे, दत्तात्रय बरगे व शुभम काणकेकर हे कर्नाटकातील कोळप येथे गेले होते. ट्रॅक्टर खरेदी करून परतत असताना सौंदत्तीजवळ मुनवळी-नरगुंद मार्गावर चालक सोणवने याचा ताबा सुटल्याने भरधाव मोटार झाडावर आदळून शेतात उलटली. यात अजित धनवडे याचा जागीच मृत्यू झाला. संतोष सुरेश सोणवने, उमेश शिवाजी मराठे व दत्तात्रय लक्ष्मण बरगे हे तिघे गंभीर जखमी झाले. शुभम सुरेश कानकेकर हा ट्रॅक्टर चालवत असल्याने सुखरूप आहे. जखमींवर सौंदत्ती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.