कुटवाडमध्ये तंटामुक्त अध्यक्षपदासाठी सोमवारी मतदान | पुढारी

कुटवाडमध्ये तंटामुक्त अध्यक्षपदासाठी सोमवारी मतदान

शिरटी : पुढारी वृत्तसेवा

कुटवाड (ता. शिरोळ ) येथे तंटामुक्त अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकारण शिगेला पोचले आहे. शिवसेनेचे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर -राष्ट्रवादी, गणपतराव पाटील – काँग्रेस, शिवसेना -भाजपा अशा स्थानिक गटात राजकीय युद्ध जुंपले आहे. अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी तब्बल पंधरा जणांनी अर्ज दाखल केला आहे. गटा अंतर्गत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र यड्रावकर व शिवसेना हे दोन गट एकमेकाविरुद्ध ठाम असल्याने अध्यक्षपदाची निवड मतदानाने घेण्याचा निर्णय झाला आहे.

मतदानातून अध्यक्षपदाची निवड हा प्रकार शिरोळ तालुक्यातच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच कुटवाड येथे होत आहे. त्यामुळे या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याशिवाय तंटामुक्त अध्यक्षपदाच्या निवडणुकीला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची झालर असल्यामुळे ऐनवेळी कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.सोमवारी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान होणार आहे.

तीन हजार लोकसंख्या असलेल्या कुटवाड गावात अध्यक्षपदासाठी राजकीय द्वंद सुरू झाले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधातील यड्रावकर व गणपतराव पाटील हे दोन गट एक एकत्र आले आहेत. भाजप गटातील काही कार्यकर्ते पाटील गटात सहभागी झाले आहेत. परंतु मा.आ.उल्हास पाटील यांच्या शिवसेना गटाने भाजपच्या उर्वरित कार्यकर्त्यांची मोट बांधून राजकिय युद्ध पुकारले आहे. निवडणुक लढवणाऱ्या एका इच्छूकांच्या मध्यस्तीतुन जिल्हा बँकेसाठी चार मतांची बेरीज करण्यात आली आहे. त्यामुळे पाटील गटाला शिवसेना सोबत जावे लागेल अशी चर्चा आहे.

Back to top button