कागल-सातारा महामार्गावर वाहनधारकांची कसरत | पुढारी

कागल-सातारा महामार्गावर वाहनधारकांची कसरत

कोल्हापूर, सुनील सकटे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गातील कागल-सातारा या रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सुरू झाल्याने या मार्गावर वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खोदाई, अस्तरीकरण अशा विविध कामांमुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. अशातच मुंबई-गोवा महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे कोकणात जाणारी वाहतूक पुणे बेंगलोर या महार्गाकडे वळली आहे.

मुंबई-गोवा महामार्ग अत्यंत खराब झाला आहे. अनेक ठिकाणी कामे रखडली आहेत. अशातच गणेशोत्सवात पुणे-मुंबईत राहणार्‍या कोकणातील चाकरमान्यांसह पर्यटकांना मुंबई गोवा मार्गास पर्याय म्हणून पुणे-बेंगलोर या मार्गाचा वापर करण्यात येत आहे. कागल-सातारा महामार्गाचेही सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. सातारा मार्गावर तब्बल आठ ते नऊ ठिकाणी महापुराचे पाणी महामार्गावर आल्याने वाहतूक बंद होती. याचा विचार करून नवीन डीपीआर बनविण्यात आला आहे. या महामागार्गासाठी दोन टप्प्यात कामे देण्यात आली आहे. पेठ ते शेंद्रे हा 67 कि.मी.चा 1895 कोटी रुपयांचा प्रस्ताव असून, कागल ते पेठ हा 63 कि.मी.चा 1502 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. एकूण 3397 कोटींची ही कामे आहेत. यापैकी कागल ते पेठ नाका हे काम सोल्युशन रोडवेज पुणे यांना तर पेठ नाका ते सातारा अदानी ग्रुपला काम मिळाले आहे.

कराड येथील उड्डाण पूल पाडल्यामुळे येथील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. कराड ते तासवडे या परिसरात युद्धपातळीवर काम सुरू असल्याने या भागात पोकलॅन, जेसीबी डंपर अशा यंत्रसामग्रीमुळे वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे.

कोकणात जाण्यासाठी पर्याय

मुंबई-गोवा महामार्गावरील अडचणीमुळे कोकणात जाण्यासाठी पुणे-बेंगलोर महामार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने या मार्गावर वाहतूक वर्दळ वाढली आहे. या महामार्गावरून कोकणात जाण्यासाठी वाठार, कासारवाडी, शिये, तावडे हॉटेल (कोल्हापूर), कागल, निपाणी, संकेश्वर या फाट्याद्वारे वाहनधारकांची सोय आहे.

महमार्गावर बहुतांश ठिकाणी खोदाई

या महमार्गावर बहुतांश ठिकाणी खोदाई केल्याने काही ठिकाणी सेवामार्गावरून तर काही ठिकाणी मुख्य मार्गावरून वाहतूक सुरू आहे. दुतर्फात काम सुरू असल्याने ऐन सणासुदीत वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

Back to top button