

यड्राव, पुढारी वृत्तसेवा : शहापूर येथे खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करून लुटणार्या जर्मनी टोळीच्या म्होरक्यासह साथीदाराने पोलिस ठाण्यातच विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. शहापूर पोलिस ठाण्याच्या कोठडीमध्ये सोमवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. म्होरक्या आनंद्या ऊर्फ आनंद शेखर जाधव ऊर्फ जर्मनी (वय 26) व या गुन्ह्यामध्ये रविवार रात्री उशिरा अटक करण्यात आलेला अक्षय कोंडुगळे (दोघे रा. इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान, दोघांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना इचलकरंजीतील आयजीएम व नंतर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी आनंद जर्मनी याची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे घडला प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन वैद्यकीय कोठडीची मागणी करण्यात आली आहे. दोघांवर जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
शहापूर येथील म्हसोबा मंदिरजवळ सरदार अमीन मुजावर (वय 48, रा. शहापूर) यांना कोयत्याचा धाक दाखवत अपहरण करून जर्मनी टोळीने 19 तोळे सोन्याचे दागिने, हातातील घड्याळ जबरदस्तीने काढून घेतले होते. तसेच सहिसलामत सोडायचे असल्यास सेटलमेंट म्हणून त्यांच्याजवळ असलेली 4 लाख रुपयांची रोकड, असा एकूण 11 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला होता.
या प्रकरणातील मुख्य संशयितासह 14 जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी 13 जण न्यायालयीन कोठडीत आहेत, तर आनंद जर्मनी हा पोलिस कोठडीत आहे. रविवारी रात्री उशिरा अक्षय यास पोलिसांनी अटक केली आहे.
म्होरक्या आनंद जर्मनी याची पोलिस कोठडी संपत असल्याने त्याच्यासह अक्षयला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. रविवारी गृहरक्षक दलाचा बंदोबस्त संपला होता, तर सोमवारी यड्राव बंद असल्यामुळे पोलिस बंदोबस्तासाठी तेथे होते. त्यामुळे ठाण्याकडे मोजकीच संख्या होती. याचा फायदा घेत सकाळी 11 च्या सुमारास आनंद व अक्षय यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना उलट्या होऊ लागल्यामुळे कर्मचार्यांच्या लक्षात आले.
त्यांना तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह कर्मचार्यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी नातेवाईक व मुलांनी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांकरिता कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहापूर पोलिस ठाण्यात खळबळ उडाली आहे.