कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या तोफा आज धडाडणार | पुढारी

कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या तोफा आज धडाडणार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि. 10) तपोवन मैदानावर सायंकाळी 5 वाजता आयोजित केलेल्या उत्तरदायित्त्व सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या तोफा धडाडणार आहेत. दरम्यान, या सभेची तयारी पूर्ण झाली असून एक लाखापेक्षा अधिक लोक उपस्थित राहतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेली उत्तरदायित्त्व सभा कोणाला उत्तर देण्यासाठी अथवा कोणाशी इर्ष्या करण्यासाठी आयोजित केलेली नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील संभ—मावस्था दूर करण्याच्या हेतूने ही सभा आयोजित केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे. महाविद्यालयीन शिक्षण त्यांचे कोल्हापुरात झाल्यामुळे कोल्हापूरवर त्यांचे विशेष प्रेम आहे.

केंदाळमुक्त रंकाळा त्यांच्यामुळे पाहावयास मिळतो. कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली थेट पाईपलाईन योजना, न्याय संकुल, खासबाग मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, शिवाजी विद्यापीठ, राजाराम कॉलेज तसेच रस्त्यांसाठी नगरोत्थानमधून भरीव निधी त्यांनी कोल्हापूरला दिला आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन झाल्यानंतर ताराराणी चौकातून तपोवन मैदानापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये दोन ते अडीच हजार मोटार सायकल व पाचशे कार असणार आहेत, असेही मुश्रीफ म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आदिल फरास, के. पी. पाटील, सुनील पाटील, विकास पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी उपस्थित होते.

प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधणार

खंडपीठ, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, जोतिबा परिसर विकास आराखडा, काळम्मावाडी धरणाला लागलेली गळती आदी कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांकडे या सभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Back to top button