kolhapur rain : महिन्याच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरात बरसला | पुढारी

kolhapur rain : महिन्याच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरात बरसला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला. शनिवारी पहाटेपासूनच शहरासह ग्रामीण भागात पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री 9.30 नंतर कोल्हापूरला धुवाँधार पावसाने झोडपून काढले. गेल्या 24 तासांत 13.8 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात सर्वाधिक 68.2 मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. शनिवारी कोल्हापूर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला. शुक्रवारी तुरळक पावसाची नोंद झाली होती. मात्र, शनिवारी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारी चारनंतर पावसाची रिपरिप वाढली होती. सायंकाळी सहानंतर पावसाने काहीसा जोर धरला होता. रात्री 9.30 नंतर पावसाचा जोर वाढला होता. यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. गणेशोत्सवजवळ आल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लगबग आहे. मात्र, शनिवारी पावसामुळे बाजारपेठांमधील गर्दी मंदावली होती.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, कोल्हापुरात दि. 9 सप्टेंबर रोजी सरासरी 6.3 मि.मी. पाऊस होतो. शनिवारी 24 तासांच्या सरासरीच्या तुलनेत 119 टक्के अधिक पाऊस झाला. ग्रामीण भागातही जोरदार पाऊस कोसळत होता. गगनबावडा, शाहूवाडी, भुदरगड, राधानगरी तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या पिकाला दिलासा मिळाला आहे.

तापमान 3 अंशांनी घसरले

पावासाला सुरुवात झाल्याने वातावरणातही गारवा निर्माण झाला होता. शनिवारी कमाल तापमानात 3 अंशांची घट होऊन पारा 25.6 अंशांवर स्थिरावला होता, तर किमान तापमान 21.7 अंशांवर होते.

Back to top button