करंजोशीत विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार | पुढारी

करंजोशीत विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार

सरूड : शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथील राजर्षी शाहू करिअर अ‍ॅकॅडमीच्या संस्थापक संचालकाने एका 15 वर्षांच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा घृणास्पद आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संजय बळीराम लोकरे (रा. आंबर्डे, ता. शाहूवाडी) असे संशयित संचालकाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध शाहूवाडी पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आपल्याला खोलीत झोपायला बोलावून पायाला मालिश करण्याच्या बहाण्याने संशयिताने जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली, अशी फिर्याद संबंधित पीडित अल्पवयीन मुलाने दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दिली.

उपविभागीय पोलिस अधिकारी जयकुमार सूर्यवंशी यांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी रात्री घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. 26 ऑगस्टच्या रात्री साडेदहाच्या सुमारास हा अत्याचाराचा प्रकार घडला असल्याचे समोर आले. शाहूवाडी पोलिसांना त्यांनी तपासाच्या विशेष सूचना दिल्या. पोलिसांनी तातडीने हालचाल करीत संशयित संजय लोकरे याला सोमवारी रात्री उशिरा अटक केली असून, त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. मंगळवारी (दि. 5) दुपारी जिल्हा विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायदंडाधिकार्‍यांनी त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी पीडित मुलगा हा चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथील रहिवासी असून, सध्या तो राजर्षी शाहू करिअर अ‍ॅकॅडमी (करंजोशी, ता. शाहूवाडी) येथे सैनिकी शिक्षण व पूर्वतयारीसाठी वास्तव्यास आहे. त्याचे व्यावसायिक शिक्षण झाले आहे. शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी जयकुमार सूर्यवंशी अधिक तपास करत आहेत.

Back to top button