जालना येथील आंदोलकांवर लाठीमाराचा कोल्हापुरात निषेध

जालना येथील आंदोलकांवर लाठीमाराचा कोल्हापुरात निषेध
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 'मराठा आंदोलकांसह महिलांवर लाठीमार करणार्‍या आणि गोळीबार करणार्‍या पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारचा धिक्कार असो', 'याचा हिशेब चुकता होईल…', या नालायक सरकारचं करायचं काय? खाली डोकं-वर पाय', 'जालना एसपीला निलंबित करा', 'एक मराठा-लाख मराठा…' यासह विविध घोषणा देत शुक्रवारी रात्री मराठा संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जालना येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.

जालना येथे मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन सुरू असताना आंदोलकांवर पोलिसांनी भ्याड हल्ला चढवून अमानुष लाठीमार केला. पुरुषांबरोबरच महिला आंदोलकांवर लाठीचार्ज करून रक्तबंबाळ केले, हवेत गोळीबार करण्यात आला. या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाज संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते काळे स्कार्प डोक्याला बांधून व काळ्या फिती दंडाला लावून छत्रपती शिवाजी चौकात एकवटले. जोरदार घोषणाबाजीनंतर त्यांनी या घटनेसाठी कारणीभूत असणार्‍या जालन्याच्या जिल्हा पोलिसप्रमुखांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी. घटनेची जबाबदारी उचलून गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

यावेळी आंदोलकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. दिलीप देसाई म्हणाले, जालना येथील मराठा आंदोलकांच्या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू असताना निर्दयी सरकारने आंदोलन मोडून काढण्यासाठी अचानक लाठीमार करून आंदोलकांना पळवून लावले. मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? जिल्हा पोलिसप्रमुख कोणाचा पाहुणा आहे? असे सवाल त्यांनी उपस्थित करून मराठाद्वेषी एसपींची बदली करण्याची मागणी केली.

वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा आरक्षणासाठी शांततेने आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू होते. जालन्यातील बंद आंदोलनाला हजारो आंदोलक एकवटले असताना पोलिसांनी बेछूट लाठीमार आणि आंदोलकांना पळवून लावण्यासाठी गोळीबार केला. महिला आंदोलकांनाही मारहाण करण्यात आली. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात असे घडत असेल तर मराठा पुन्हा पेटून उठेल. या संपूर्ण घटनेसाठी जबाबदार असणार्‍या जालन्याच्या एसपींना बडतर्फ करावे आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असणार्‍या आंदोलनाच्या आंदोलकांवर गेल्या 55 वर्षांत कधीही हल्ला झाला नव्हता. मात्र, विद्यमान सरकारने आजपर्यंतच्या इतिहासाला काळिमा फासला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी हेच या मागचे कारण आहे. याचा पहिला प्रयोग शासनाने मराठा आंदोलकांवर केला आहे; पण याचा हिशेब त्यांना चुकता करावा लागेल.

दिलीप पाटील म्हणाले, शांततेने सुरू असणारे आंदोलन मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने लाठचार्ज करून गोळीबार केला. सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणा सुरू आहे. यामुळे याच्या निषेधार्थ जनतेतून उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदबाबतचा निर्णय राज्यातील समन्वयकांशी चर्चा करून लवकरच घेण्यात येईल.

रविकिरण इंगवले म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण इतर समाजांचे आरक्षण काढून मागत नाही. असे असतानाही महाराष्ट्र राज्य शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. जालना घटनेसाठी जबाबदार एसपींना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली.

यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, शाहीर दिलीप सावंत, युवासेनेचे मंजीत माने यांनीही राज्य शासन व पोलिस प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आंदोलनात अजित सासने, कुलदीप गायकवाड, सरदार पाटील, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, चंद्रकांत चव्हाण, प्रताप नाईक, विजय पाटील, दीपक मुळीक, प्रतीक साळुंखे, प्रणव डाफळे, विराज पाटील, नील मुळीक, प्रसाद पाटील, महादेव जाधव, उदय लाड, अवधूत पाटील आदींचा सहभाग होता. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news