१९९ कोटींची ‘एफआरपी’ अद्यापही थकीत | पुढारी

१९९ कोटींची ‘एफआरपी’ अद्यापही थकीत

राशिवडे; प्रवीण ढोणे : गळीत हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, तरी राज्यातील ६२ साखर कारखान्यांनी अद्यापही मागील गळीत हंगामातील उर्वरित १९९ कोटींची ‘एफआरपी’ अदा केलेली नाही. हंगाम सुरू होण्याआधी उर्वरित थकीत ‘एफआरपी’ न दिल्यास या कारखान्यांच्या चिमण्या पेटण्याची शक्यता धूसरच आहे.

गत हंगामामध्ये राज्यातील सहकारी व खासगी अशा २११ कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला. यामधील १४९ कारखान्यांनी गेल्या महिनाअखेर पूर्ण ‘एफआरपी’ अदा केली आहे. यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यास काही दिवस उरले असताना, राज्यातील ६२ कारखान्यांनी शेतकर्‍यांची अद्याप १९९ कोटींची ‘एफआरपी’ अदा केलेली नाही. ऑगस्ट महिनाअखेर २१० पैकी १४९ कारखान्यांनी ‘एफआरपी’ अदा केली असून, ८० ते ९९ टक्क्यांपर्यंतची ‘एफआरपी’ ५६ कारखान्यांनी दिली आहे.

६० ते ७९.९९ टक्क्यांपर्यंत १, तर ० ते ५९ टक्क्यांपर्यंत ५ कारखान्यांनी रक्कम शेतकर्‍यांना दिली आहे. बहुतांश कारखान्यांनी एकूण देय रकमेच्या ९८.४० टक्के रक्कम दिली आहे. गतवर्षी २११ साखर कारखान्यांनी हंगाम घेतला. १ हजार ५३ लाख टन उसाचे गाळप झाले. ऊसतोडणी वाहतूक खर्चासह ३५ हजार ५३२ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ झाली. यापैकी ३५ हजार ३३३ कोटी रुपये शेतकर्‍यांना दिले. १९९ कोटी रुपयांची थकीत देणी अजूनही कारखान्यांकडे आहेत.

कारवाईचा बडगा उगारला जाणार

पुढील हंगाम सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना १९९ कोटींची ‘एफआरपी’ अदा न केल्यास त्या कारखान्यांना गाळप परवाना नाकारला जाण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने पूर्वहंगामी कर्जाची उचल करून कारखान्यांनी नव्या हंगामाची तयारी केली असताना थकीत ‘एफआरपी’ अदा न करणार्‍या कारखान्यावर कारवाईचा बडगाही उगारला जाणार हे निश्चित.

Back to top button