कोल्हापुरात शेंडा पार्कात होणार ११०० खाटांचे नवे रुग्णालय | पुढारी

कोल्हापुरात शेंडा पार्कात होणार ११०० खाटांचे नवे रुग्णालय

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर मधील शेंडा पार्क येथे 1,100 खाटांच्या नव्या रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाला सादर केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी सांगितले.

कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सीमाभागातील रुग्णांसाठी सीपीआर हेच आधारवड आहे. या जिल्ह्यांतून रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल होत असतात. यामुळे सीपीआरवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी सार्वजनिकआरोग्य विभागाकडे असलेले आणि जिल्हा रुग्णालय म्हणून अनेक वर्षे कार्यरत असलेले सीपीआर सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे. सीपीआर वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करताना विरोध करण्यात आला होता. त्यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वतंत्र रुग्णालय सुरू झाल्यानंतर सीपीआर पूर्ववत सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केले जाईल, असे शासनाकडून सांगण्यात आले होते.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वाकडे चालले आहे. काही विभागांसह प्रशासकीय विभागही शेंडा पार्क येथील इमारतीत स्थलांतरित करण्यात आला आहे. येत्या एक-दोन वर्षात सर्व विभाग शेंडा पार्क येथील इमारतीतच स्थलांतरित होतील, अशी परिस्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेंडा पार्क येथे 1,100 खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सीपीआर रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांतील सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल. रुग्णालयाच्या स्वच्छतेसह आवश्यक साधनसामग्री, त्याकरिता कर्मचारीवर्ग कसा उपलब्ध करता येतील, यासाठीही नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केल्याचेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत लवकरच संगणकीकृत नोंदणी सुरू होईल, त्यामुळे प्रत्येक रुग्णाची आरोग्यपत्रिका तयार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button