कोल्हापूर : सराफासह कामगाराचे अपहरण, दरोडा; टोळीतील सातजणांना सक्तमजुरी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राजेंद्रनगर येथील सराफी व्यावसायिक चिंतामणी पवार यांच्यासह कामगारांचे अपहरण करून जबरदस्तीने त्यांच्याकडील तीन किलो सोन्यासह दोन कोटी 52 लाखांची रोकड लुटल्याप्रकरणी म्होरक्या लक्ष्मण अंकुश पवार (वय 29, रा. खटके वस्ती, लिगीवरे, ता. आटपाडी, जि. सांगली) याच्यासह टोळीतील 7 जणांना न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरविले. आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 40 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) एस. एस. तांबे यांनी निकाल दिला. सरकार पक्षामार्फत अॅड. अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले. शिक्षा झालेल्यात लक्ष्मण पवार याच्यासह गुंडाजी तानाजी नंदीवाले (29, तमदलगे, ता. शिरोळ), अविनाश बजरंग मोटे (29, मोटे गल्ली, शिवाजी चौक, हातकणंगले), अक्षय लक्ष्मण मोहिते (29, आंबेडकरनगर, हातकणंगले), इंद्रजित बापू देसाई (25, हातकणंगले), राजीव ऊर्फ झुमर्या बळीराम कदम (28, यमाईनगर, दिघंची, ता. आटपाडी), संतोष ऊर्फ भावड्या ज्ञानोबा मोरे (31, दिघंची, आटपाडी) यांचा समावेश आहे.
टोळीतील साथीदार सोमनाथ यल्लाप्पा माने (यमाईनगर, दिघंची) हा अद्यापही फरार आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन निरीक्षक तानाजी सावंत यांनी गुन्ह्याचा तपास करून टोळीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, मूळचे आटपाडी तालुक्यातील सराफ व्यावसायिक चिंतामणी पवार (सध्या रा. राजेंद्रनगर) हे किशोर शिंदे व विकास कदम यांच्या फर्ममध्ये नोकरीला होते. 14 जून 2019 रोजी पवारसह मुंबईतून मोटारीने कोल्हापूरला आले होते. राजेंद्रनगर येथील घराच्या दिशेने जात असताना पहाटे अंधारात टोळीने त्यांची मोटार अडविली.
मोटारीवर दगडफेक करून काचा फोडल्या. पवारसह कामगारांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून मोटारीच्या डिकीमधील तीन किलो सोने, दोन कोटी 52 लाखांची रोख रक्कम हिसकावून घेतली. फिर्यादीसह कामगारांना मोटारीत घालून सर्वांना कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील निर्जन ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्यांच्या अंगावरील वस्त्रे उतरवून त्यांना सोडून दिले व मुद्देमालासह टोळीने पलायन केले होते. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषणने टोळीतील 7 जणांना अटक केली होती. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) तांबे यांच्यासमोर झाली. सरकारी वकील महाडेश्वर यांनी खटल्यात 18 साक्षीदार तपासले होते. साक्षीदारांचे जबाब, सरकारी वकिलांचा युक्तिवाद तसेच अन्य खटल्यातील निवाड्यांच्या आधारे टोळीतील 7 जणांविरुद्ध गुन्हे शाबित झाले. सातही जणांना न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 40 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्याच्या निकालाकडे कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते.