कोल्हापूर: पन्हाळा-वाघबीळ मार्गावरील लॉजवर वेश्या व्यवसाय; दोघांना अटक | पुढारी

कोल्हापूर: पन्हाळा-वाघबीळ मार्गावरील लॉजवर वेश्या व्यवसाय; दोघांना अटक

पन्हाळा, पुढारी वृत्तसेवा: येथील राक्षी- वाघबीळ रोडवरील विनोद रिसॉर्ट फॅमिली स्टे लॉजिंगवर कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी वेश्या व्यवसाय चालवत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले. तर दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाने दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बाबू नावाची एक व्यक्ती विनोद रिसॉर्ट फॅमिली स्टे या हॉटेलवर वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हा अन्वेषण विभागाने सापळा रचून हॉटेलवर छापा टाकला. या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालविणारे एजंट विनोद सुरेश पवार (वय २१, रा. मुळगाव-वडगाव, देवरुख, जि. रत्नागिरी) व सुहास सुभाष मोरे (वय २३, रा. ढोलेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) यांना ताब्यात घेतले.

तर दोन महिला भिवंडी व कोल्हापूर येथील असून त्या दोघींची सुटका करण्यात आली आहे. यावेळी विनोद पवार यांच्याकडून १ लाख २२ हजार ५२ रुपये रोख रक्कम, कार, दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

ही कारवाई गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गीतांजली बाबर, सहायक फौजदार राजेंद्र घारगे, मीनाक्षी पाटील, किशोर सूर्यवंशी, उत्तम सडोलीकर, अभिजीत घाडगे, अश्विनी पाटील, तृप्ती सोरटे, किरण पाटील, शुभांगी कांबळे यांनी केली. पुढील तपास पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button