मंत्री मुश्रीफांसह पदाधिकार्‍यांकडून ‘एमआयडीसी’तील उद्योजकांना त्रास : आ. रोहित पवार | पुढारी

मंत्री मुश्रीफांसह पदाधिकार्‍यांकडून ‘एमआयडीसी’तील उद्योजकांना त्रास : आ. रोहित पवार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांना मंत्री हसन मुश्रीफ व त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक त्रास देऊन अडचणी निर्माण करत असल्याच्या तक्रारी उद्योजकांनी आपल्याकडे केल्या आहेत, असा आरोप आ. रोहित पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. अशा तक्रारी यापूर्वीही आमच्याकडे आल्या होत्या; परंतु हे आता थांबले पाहिजे, अन्यथा नवीन कंपन्या कोल्हापुरात येणार नाहीत, असेही ते म्हणाले.

भाजपमध्ये सध्या राज्यात असलेल्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळेच भाजप दुसर्‍यांचे पक्ष फोडत आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या सभेच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते कोल्हापुरात आहेत. आ. पवार गुरुवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. ते म्हणाले, मुश्रीफ यांच्यावर शरद पवार यांचा खूप विश्वास होता. 1998 मध्ये सर्वांचा विरोध असताना मुश्रीफ यांना त्यांनी संधी दिली. तरीही ते गेले. त्यामुळे आता अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळेल. पूर्वीपेक्षा ताकदीने लढण्याच्या तयारीत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. कोल्हापुरातील पुरोगामी विचार पुसून काढण्याचा प्रयत्न काही जातीयवादी शक्तींनी केला. शासकीय यंत्रणेला हाताशी धरून दंगल घडविली; परंतु त्याला कोल्हापूरच्या जनतेनेच रोखले.

समतेचा संदेश देणार्‍या राजर्षी छत्रपती शाहूरायांचे वंशज म्हणून शाहू महाराज यांना सभेचे अध्यक्षस्थान भूषविण्याची आम्ही विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. यामध्ये आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही, असे सांगून आ. पवार म्हणाले, शरद पवार भाजपसोबत कधीही गेले नाहीत. दिल्लीसमोर ते कधीही झुकणार नाहीत. तरीही त्यांच्याबाबत तसेच पक्षातील अन्य नेत्यांबाबत भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा विरोधकांकडून पसरविल्या जातात. निवडणुका जवळ येतील तसे अफवांचे पीक जोमात येणार आहे. त्याकडे फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नाही.

यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहर अध्यक्ष आर. के. पोवार, महिला प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण, नितीन पाटील, सुनील देसाई, रोहित पाटील आदी उपस्थित होते.

अंबाबाईच्या दर्शनासाठी दुचाकीवरून प्रवास आ. पवार यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. गर्दी पाहून कार्यकर्त्याच्या मोटारसायकलवर बसून ते दर्शनासाठी गेले. त्यानंतर बालगोपाल तालमीजवळील मित्राला भेटण्यासाठीही त्यांनी मोटार सायकलवरून जाणे पसंद केले.

Back to top button