कोल्हापूर : नाईकने केला पैशांचा ’खेळ’; महिलेवर घर विकण्याची वेळ | पुढारी

कोल्हापूर : नाईकने केला पैशांचा ’खेळ’; महिलेवर घर विकण्याची वेळ

कोल्हापूर, गौरव डोंगरे : गुंतवणूकदारांकडून दररोज होऊ लागलेल्या मोठमोठ्या रकमेच्या गुंतवणुकीने नाईक बंधूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी चित्रपट निर्मिती, म्युझिक अल्बमसोबतच जमिनी खरेदीकडे पैसा वळवला. यातूनच गगनबावडा, राधानगरी, आंबा, रंकाळा परिसर, निर्माण चौक येथील अनेक मोक्याच्या जमिनी खरेदी करण्यासाठी नाईक सरसावला. यातील अनेक व्यवहारांत तो आतबट्ट्यात आला आहे; पण अशाच एका गुंतवणूकदार महिलेकडे पैसे गुंतवलेल्यांनी तगादा सुरू केल्याने तिला स्वत:चे घर विकण्याची वेळ आली आहे.

एका महिलेने मोठी रक्कम नाईककडे गुंतवली होती. यात फायदा दिसू लागल्याने तिनेही नातेवाईक, मित्रपरिवारातील काहींना येथे पैसे गुंतविण्यास सांगितले; पण याचा परतावा मिळणे बंद झाल्याने या नातेवाईकांनी या महिलेकडे तगादा लावला आहे. ते पैसे भागविण्यासाठी संबंधित महिलेने स्वत:चे घर विकलेे.

नोटरीद्वारे भरवशाचा प्रयत्न

अत्यंत सुटसुटीत, विश्वासार्ह असा मजकूर असणारी नोटरी करून नाईक पैसे स्वीकारत होता. ठाण्यातील क्लासवन अधिकार्‍यानेही नोटरीवरील मजकूर पाहून त्याचे कौतुक केले होत; पण पैसे ऑक्टोबरपासून देणे बंद केल्याने अनेकजण नोटरी घेऊन पोलिस ठाणे, वकिलांच्या पायर्‍या झिजवत आहेत. पैसे भरल्यानंतर तातडीने त्यांचे मेसेज संबंधित गुतंवणूकदाराला जात होते. हे पैसे आपल्याच खात्यात आहेत, असे भासवले जात होते. यामुळे अनेकांना हे सर्व व्यवहार पारदर्शी वाटले; पण ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या भोगणची कमाल होती.

जमिनींच्या खरेदीत आतबट्ट्यात

पन्हाळ्यात 5 गुंठे जमीन, रंकाळा परिसरात 20 गुंठे जमीन, आंब्यांत 7 एकर, गगनबावड्यातील जमीन व्यवहारातील विजय जाधव यालाही पोलिसांनी अटक केली आहे. रंकाळा येथील व्यवहार 14 कोटींना झाल्याचे समजते, मात्र ही जागाही राखीव क्षेत्र आहे.

देवस्थानांना वर्गणी

हेरिटेज ऑक्शनसाठी 2 कोटी रुपये नाईक याने खर्च केले. तसेच गणेशोत्सव, नवरात्रौत्सवासाठी स्थानिक मंडळांना मोठ्या वर्गण्या देऊ केल्या आहेत. कोल्हापुरातील एका मंडळाला तर 5 लाखांची पावती केल्याचे समजते.

मुलाचा वाढदिवस थ्री स्टार

संग्रामने स्वत:च्या मुलाचा वाढदिवस एका थ्री स्टार हॉटेलमध्ये साजरा केला होता. त्याने यावेळी मोठा झगमगाट केला होता. या वाढदिवसाला प्रसिद्ध मालिकेच्या अभिनेत्याला व अभिनेत्रीला आमंत्रित करण्यात आले होते. या वाढदिवसावेळी त्याने केलेला खर्चही अनेक गुंतवणूकदारांनी डोळ्यांनी पाहिला.

शेराला भेटला सव्वाशेर

नाईकने आंबा परिसरात 7 एकर जमीन घेतल्याचे समजते. एकरला 4 लाखांचा दर असताना एका बहाद्दराने 7 एकर जागेसाठी नाईककडून 1 कोटी 70 लाख उकळल्याची चर्चा आहे. तर निर्माण चौकातील 8 गुंठे जमीन नाईकच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करून दुसर्‍याने पैसे लाटले, असेही सांगण्यात येते.

Back to top button