ऑगस्टच्या साखर कोट्यात 2 लाख मेट्रिक टन वाढ | पुढारी

ऑगस्टच्या साखर कोट्यात 2 लाख मेट्रिक टन वाढ

कोल्हापूर, डी. बी. चव्हाण : केंद्र सरकारने मंगळवारी साखर कारखान्यांना वाढीव साखर कोटा जाहीर केला. 2 लाख मेट्रिक टन वाढीव साखर कोटा मंजूर झाला आहे. वाढीव कोट्यामुळे खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणावर साखर येणार असल्याने साखरेचे दर गडगडतील, अशी भीती कारखानदारांकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी सरकारने साखरेचा दर 3,800 रुपये क्विंटल करा, अशी मागणी कारखानदारांकडून होत आहे.

केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी 23.50 लाख मेट्रिक टन साखर कोटा जाहीर केला होता. त्यानुसार कारखान्यांनी आपली साखर विक्री करणे सुरू केले होते. त्यानंतर अचानक केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन जादा साखर कोटा जाहीर केला आहे. त्यामुळे 25.50 लाख मेट्रिक टन साखर विक्रीसाठी खुल्या बाजारात येणार आहे. वाढीवर साखर कोट्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना 500 ते 1 हजार टनांपर्यंत साखर विक्री करता येणार आहे. वाढीव साखर कोट्याबाबत साखर कारखानदारांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

साखर दर वाढवून द्या; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

सध्या साखरेला 3800 रुपये क्विंटलला दर मिळत आहे. आता जादा साखर विक्रीसाठी आल्यास हाच दर 3600 ते 3700 रुपये क्विंटलवर जाऊ शकतो, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

एक क्विंटल साखर विक्रीसाठी कारखान्यांना 3 हजार 720 रुपये खर्च येतो. साखरेचा दर कमी झाल्यास कारखान्यांना कमी दरात साखर विक्री करावी लागणार आहे, त्यामुळे कारखान्यांना तोटा सहन करावा लागणार आहे. यामुळे सरकारने साखरेचा दर 3800 रुपये क्विंटल करावा, अशी मागणी साखर कारखानदारांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती साखर तज्ज्ञ
पी. जी. मेढे यांनी दिली.

राज्यनिहाय साखर कोट्याची माहिती अशी :

आंध-प्रदेश : 20 हजार 605 मे. टन, वाढीव 1 हजार 778 मे. टन.
बिहार : 42 हजार 280 मे. टन, वाढीव 3 हजार 601 मे. टन.
छत्तीसगड : 5 हजार 71 मे. टन, वाढीव 268 मे. टन.
गुजरात : 85 हजार 187 मे. टन., वाढीव 7,538 मे. टन.
हरियाणा : 61हजार772 मे. टन., वाढीव 5 हजार941 मे. टन.
कर्नाटक : 3 लाख46हजार651 मे.टन, वाढीव 30 हजार 52 मे.टन.
मध्यप्रदेश : 30 हजार 154 मे.टन, वाढीव 2 हजार 407 मे.टन
महाराष्ट्र : 7 लाख 49 हजार 378 मे.टन., वाढीव 65 हजार 717 मे. टन.
उत्तरप्रदेश : 8 लाख 31 हजार 409 मे. टन, वाढीव 69 हजार 105 मे.टन.
ओडिशा : 1 हजार 568 मे. टन, वाढीव 137 मे. टन.
पंजाब : 37 हजार 092 मे. टन. वाढीव, 3 हजार 133 मे.टन.
राजस्थान : 633 मे. टन, वाढीव 77 मे. टन.
तामिळनाडू : 78 हजार 06 मे. टन, वाढीव 6 हजार 445 मे. टन.
तेलंगणा : 2 हजार 134 में. टन., वाढीव 456 मे. टन.
उत्तरांचल : 58 हजार 70 मे. टन, वाढीव 3 हजार 300 मे. टन.

Back to top button