कोल्हापूर : आयुक्तांसमोर उत्पन्नवाढ, नागरी सुविधांचे आव्हान | पुढारी

कोल्हापूर : आयुक्तांसमोर उत्पन्नवाढ, नागरी सुविधांचे आव्हान

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूर शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. प्रशासनात कुणाचा कुणाला ताळमेळ नसल्याची स्थिती आहे. कोट्यवधींचा निधी असूनही प्रकल्प अधर्वट आहेत. एकेका विभागात पाच-दहा वर्षे अधिकारी-कर्मचारी तळ ठोकून आहेत. पारंपरिक उत्पन्नावरच महापालिकेचा कारभार हाकला जात आहे. त्यामुळे शहरवासीयांना सुविधा पुरविणे, अन्य उत्पन्नवाढीसाठी नवनवीन प्रयत्न करून महापालिकेला आर्थिकद़ृष्ट्या सक्षम करणे हे नूतन प्रशासक तथा आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

नदीला पाणी; पण नळाला नाही

कोल्हापूर शहराजवळून पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. परंतु, शहरवासीयांना पाण्यासाठी ताटकळत बसावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांच्या अकार्यक्षमतेचा फटका नागरिकांना बसत आहे. तसेच 25 ते 30 वर्षांपूर्वीची जुनाट यंत्रणा असल्याने अनेकवेळा पंपांत बिघाड होत आहे. पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने रात्री-अपरात्री आणि पहाटेसुद्धा तास-दोन तास नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, त्यानंतर दिवसभर पाणी मिळत नाही. गेल्या काही महिन्यांत तर अनेकवेळा संपूर्ण शहरात पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

कचर्‍याचे डोंगर

गेल्या काही वर्षांत शहरात नागरी सुविधांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत. शहरात दररोज सुमारे 200 टन कचरा जमा होत आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नाही. परिणामी, लाईन बाजार परिसरात कचर्‍यावर कचरा साठवून डोंगर तयार केले जात आहेत. कचरा संकलनासाठी घेतलेली वाहने मेंटेनन्सअभावी पडून आहेत. त्यातच कचरा कोंडाळे नसल्याने शहरात अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावरच दिसत आहे.

ही आहेत आव्हाने

थेट पाईपलाईनचा प्रश्न 2014 पासून सुरू आहे
115 कोटींच्या अमृत योजनेची कामे पूर्ण करणे
100 कोटींच्या रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविणे
रोज जमा होणार्‍या 200 टन कचर्‍याची विल्हेवाट लावणे
पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे
शहरातील कोट्यवधींचे विविध प्रकल्प पूर्ण करणे
तोट्यातून धावणार्‍या केएमटीला रुळावर आणणे
अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविणे
घरफाळा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करणे
रोजंदारी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करणे
अधिकारी-कर्मचार्‍यांचा नवा आकृतिबंध मंजूर करणे
शहरात इमारतींमधील पार्किंग व स्वच्छतागृहांचे प्रश्न
शहरातील फेरीवाल्यांचे प्रश्न सोडवून झोन तयार करणे

खड्ड्यांचा प्रश्न गंभीर
शहरातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही रस्ते वगळले तर बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी केलेले रस्तेही पावसाच्या पाण्यात धुऊन गेले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडत आहे. तसेच अपघातांची संख्या वाढली असून, त्यात काहींना जीव गमवावा लागला आहे. खड्ड्यांप्रश्नी नागरिक आंदोलने करत आहेत. एकूणच शहरातील रस्त्यांचा आणि खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

शहरातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही रस्ते वगळले तर बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी केलेले रस्तेही पावसाच्या पाण्यात धुऊन गेले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडत आहे. तसेच अपघातांची संख्या वाढली असून, त्यात काहींना जीव गमवावा लागला आहे. खड्ड्यांप्रश्नी नागरिक आंदोलने करत आहेत. एकूणच शहरातील रस्त्यांचा आणि खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Back to top button