इचलकरंजीतील जर्मनी गँगच्या तिघांना अटक | पुढारी

इचलकरंजीतील जर्मनी गँगच्या तिघांना अटक

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : येथील हॉटेलमध्ये घुसून हॉटेल व्यावसायिक व त्याच्या मुलाला मारहाण करत लूट केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी जर्मनी गँगच्या तिघाजणांना अटक केली. बजरंग अरुण फातले (वय 21), विवेक ऊर्फ विश्वास लोखंडे (19), शोएब मेहबूब पठाण (22, तिघे रा. जवाहरनगर) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनाही न्यायालयाने 23 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

याबाबतची माहिती अशी, कोल्हापूर रस्त्यावर एएससी महाविद्यालयासमोर उमेश म्हेत्रे यांचे हॉटेल आहे. याठिकाणी जर्मनी गँगमधील काहीजणांनी दहशत माजवली. साहित्य, टेबल यांची नासधूस केली. म्हेत्रे व त्यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली. चाकूचा धाक दाखवून काऊंटरमधील 7 हजारांची रोकडही काढून घेतली. चाकू दाखवत दहशत निर्माण केली होती.

याबाबत उमेश मदन म्हेत्रे यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी जर्मनी गँगच्या पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी बजरंग फातले, विवेक लोखंडे व शोएब पठाण या तिघांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील मुख्य संशयित शुभम पट्टणकुडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार पसार आहे तर आणखी एक संशयित अमर शिंगे याच्यावर आयजीएम इस्पितळात उपचार सुरू आहेत.

Back to top button