Kolhapur : कबनुरात किरकोळ कारणातून कोयत्याने हल्ला; तिघे जखमी | पुढारी

Kolhapur : कबनुरात किरकोळ कारणातून कोयत्याने हल्ला; तिघे जखमी

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा,  मांजर नेल्याच्या संशयावरून लोखंडी सळई व कोयत्याने केलेल्या हल्ल्यात इस्माईल रेहमान मकानदार व त्यांची मुले तौफिक (19) व आसिफ (वय 21) जखमी झाले. या कारणावरून संतप्त चार ते पाच जणांनी शहनाजबेगम मुख्तारअली शाहा यांना धक्काबुक्की करून घरात घुसून साहित्याची तोडफोड केली. याबाबत इस्माईल मकानदार आणि शहनाजबेगम शाहा यांनी परस्परविरोधी फिर्यादी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केल्या आहेत. ही घटना कबनुरातील दावतनगर परिसरात घडली.

दावतनगर परिसरात इस्माईल मकानदार मुलांसह राहण्यास आहेत. शेजारीच त्यांचे गोदाम आहे. याच परिसरात बबलू खान राहण्यास आहेत. खान यांना घरात पाळलेले मांजर आढळून आले नव्हते. या कारणावरून मकानदार यांच्याशी वाद झाला होता.
हा वाद गुरुवारी सकाळी उफाळून आला. त्यातून बबलू खान, मुख्तारअली आदींसह पाच ते सहाजणांनी गोदामाबाहेर उभारलेल्या मकानदार यांच्यावर हल्ला केला. लोखंडी सळई आणि कोयत्याने मारहाण केली. यादरम्यान इस्माईल मकानदार यांच्या दोन्ही मुलांनाही मारहाण केली. जखमींवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी इस्माईल मकानदार यांच्या फिर्यादीवरून मुख्तारअली व बबलू खान यांच्यासह अन्य संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.

शहनाजबेगम शाहा यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, अमन, अकिब व तौसिफ मकानदार यांच्यासह अन्य चार ते पाचजणांनी घरात घुसून मुख्तारअली यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच घरातील प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार तपास करीत आहेत.

Back to top button