मोफत वैद्यकीय तपासणीचा सीपीआरला लाभ नाही | पुढारी

मोफत वैद्यकीय तपासणीचा सीपीआरला लाभ नाही

डॅनियल काळे

कोल्हापूर : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय तपासण्या मोफत करण्याचा निर्णय घेतला असला, तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असणार्‍या सीपीआरला याचा फायदा होणार नाही. सीपीआर रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे येत असल्याने या नव्या योजनेपासून हे रुग्णालय वंचित राहणार आहे. इचलकंरजीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाला (आयजीएम) याचा फायदा होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय म्हणून छत्रपती प्रमिलाराजे 650 खाटांच्या सर्वोपचार रुग्णालयाचे नाव घेतले जाते. कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून हे रुग्णालय आरोग्य विभागाऐवजी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे येते. त्यामुळे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा या रुग्णालयाशी संबध नाही. गेल्याच आठवड्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील तपासण्या मोफत करण्याचा निर्णय घेतला. 15 ऑगस्ट 2023 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

या नव्या आदेशाचा कोल्हापूरला फारसा उपयोग होणार नाही. आयजीएम रुग्णालयात एक्सरे, सोनोग्राफी आणि रक्ताच्या काही चाचण्या होतात. त्यामुळे या रुग्णालयाला त्याचा फायदा होईल. आरोग्य विभागांतर्गत सेवा रुग्णालय कसबा बावडा, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, कोडोली, गांंधीनगर, नेसरी, राधानगरी, आजरा येथील उपजिल्हा रुग्णालये ही छोटी आहेत. 30 खाटा, 50 खाटा या क्षमतेची ही रुग्णालये आहेत. येथे तपासण्या करणार्‍या कोणत्याही यंत्रणा नाहीत.

सोनोग्राफी मशिन आहेत; परंतु रेडिओलॉजिस्ट नसल्याने अनेक ठिकाणची मशिन वापरात नाही. काही प्राथमिक रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. परंतु, महत्वाच्या कोणत्याही तपासण्या होत नाहीत. त्यामुळे या योजनेचा फायदा कोल्हापूरला होणार नाही.

सीपीआरसाठी आग्रह हवा

सीपीआर रुग्णालयाला या आदेशाचा फायदा होणार नाही. परंतु, सीपीआर हेच जिल्हा रुग्णालय असल्याने या निर्णयाचा फायदा सीपीआरला करून देण्यासाठी शासनाकडे मागणी करायला हवी. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतीत लक्ष घालायला हवे. काहीही करून सीपीआरमध्ये या तपासण्या मोफत झाल्या तर सर्वसामान्य नागरिकांवर पडणारा भार हलका होणार आहे.

Back to top button