‘एनआयए’ची छापेमारी; पोलिस यंत्रणा सतर्क | पुढारी

‘एनआयए’ची छापेमारी; पोलिस यंत्रणा सतर्क

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष पथकाने दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून कोल्हापूर शहर, इचलकरंजी व हुपरी (ता. हातकणंगले) येथे छापेमारी करून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

देशविघातक कृत्ये करणार्‍या संघटनांचे कनेक्शन उद्ध्वस्त करण्यासाठी कठोर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सोमवारी प्रभारी अधिकार्‍यांना दिले आहेत.

जिल्ह्यातील काही तरुणांचे दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे धक्कादायक व देशविघातक असून संशयितांच्या कृत्याची गंभीर दखल घेण्यात येत आहे. संशयितांसह साथीदारांच्या हालचालीवर पोलिस यंत्रणेची करडी नजर आहे. गोपनीय यंत्रणांनाही सूचना देण्यात आल्या आहेत, असे पोलिस अधीक्षक पंडित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दहशतवादी संघटनांशी संबंध आणि टेरर फंडिंगच्या संशयातून नवी दिल्ली व मुंबई येथील राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या विशेष पथकांनी शनिवारी (दि. 12) रात्री उशिरा तसेच रविवारी पहाटे कोल्हापूर शहर, इचलकरंजी व हुपरी येथे छापे टाकून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या दहशतवादी संघटनांशी तिघे संशयित संबंधित असल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.

तीन आठवड्यापूर्वी पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक करून दहशतवादी कृत्यांचा भांडाफोड केला आहे. संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीत कोल्हापूर कनेक्शन उघडकीला आले होते. जिल्ह्यात दुर्गम जंगलात स्फोटकांच्या चाचण्या घेतल्याचीही दहशतवाद्यांनी कबुली दिली होती. पाठोपाठ जिल्ह्यातील काही तरुणांचे ‘पीएफआय’ या दहशतवादी संघटनेशी लागेबांधे असल्याचा सुगावा लागल्याने राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष पथकाने छापेमारी करून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने केलेल्या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक पंडित यांना विचारताच ते म्हणाले की, देशविघातक कृत्ये करणार्‍या संघटनांसह व्यक्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलिस अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. पीएफआय अथवा दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहण्याचा प्रकार गंभीर आहे. देशविघातक कृत्ये घडविणारी साखळी निश्चित उद्ध्वस्त करण्यात येईल. याबाबत यंत्रणेला सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातर्गंत गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकातील जवानांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयास्पद संस्था, संघटनांसह व्यक्तीच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्याबाबत आदेश देण्यात आल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

Back to top button