इचलकरंजी मनपाची 13.71 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल | पुढारी

इचलकरंजी मनपाची 13.71 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : महिला बालकल्याण विभागाकडील दोन शाळा इमारत दुरुस्तीचे काम न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि अधिकार्‍यांच्या बनावट सह्या करून काम पूर्ण केल्याचे दाखवले. 13 लाख 71 हजार 702 रुपयांचे बिल घेऊन महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात रणजित विलास शिंगाडे (रा. आवळे गल्ली) या मक्तेदाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी फिर्याद दिली आहे.

पंधरा दिवसांत महापालिकेतील आणखी एक घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून दोन प्राथमिक शाळांच्या इमारत दुरुस्तीचे काम मक्तेदार रणजित शिंगाडे याला देण्यात आले होते. परंतु त्याने प्रत्यक्षात काम न करता नमुना क्र. 64 वर मोजमाप पुस्तिकेचा क्रमांक बनावट नमूद करून देयक प्रमाणपत्र आदी बनावट कागदपत्रे तयार केली. त्यावर संबंधित अधिकार्‍यांच्या बनावट सह्या करून काम पूर्ण केल्याचे भासवून 13 लाख 71 हजार 702 रुपयांचा धनादेश प्राप्त करून महापालिकेची फसवणूक करत शासकीय निधीचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यापूर्वी अशाच पद्धतीने बनावट कागदपत्रे व बनावट सह्या करून काम न करता 18 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मक्तेदार शैलेश पोवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोवार याच्याकडे मागील आठवड्यात दोनवेळा चौकशीही करण्यात आली आहे. तर त्याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने तो फरारी झाला आहे.

Back to top button