गारगोटी, पुढारी वृत्तसेवा : आकुर्डे येथील बसस्थानक शेजारी गारगोटी- कडगाव रोडवर दुचाकीच्या धडकेत महाविद्यालयीन युवक ठार झाला. ही घटना शनिवारी (दि.१२) सायंकाळी ६ वाजता घडली. प्रथमेश दिलीप कुंभार (वय २२, रा. आकुर्डे) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, प्रथमेश कुंभार दुचाकीवरून गारगोटीकडे येत होता. तर अमीर रहीम शेख हाही (रा. अनफ) गारगोटीकडून मोटरसायकल वरून भरधाव वेगाने गावी जात होता. शनिवारी सायंकाळी ६ वा. सुमारास आकुर्डे बसस्थानकाशेजारी अमीर शेख याच्या भरधाव मोटरसायकलची धडक प्रथमेश कुंभार याच्या मोटरसायकलला बसल्याने प्रथमेश गंभीर जखमी झाला. जखमी प्रथमेश यास गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मृत प्रथमेश हा गारगोटी येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयामध्ये बीएससी तिसऱ्या वर्षात शिकत होता.