

दत्तवाड, पुढारी वृत्तसेवा : सुळकूड योजना रद्द करण्यासाठी कागल व शिरोळ तालुका हातात हात घालून रस्त्यावरची तसेच प्रशासनाबरोबरची लढाई लढेल. एक थेंब ही पाणी इचलकरंजीला घेऊ देणार नाही, त्यामुळे इचलकरंजीकरांनी नवीन वाद निर्माण न करता पंचगंगा प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच कृष्णा नळपाणी पुरवठा कायमस्वरूपी दुरुस्त करावी, म्हणजे त्यांची पाण्याची गरज सोईस्कररित्या दूर होईल, असे आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी स्पष्ट केले.
ते दत्तवाड येथे पाच गावांनी मिळून सुरू केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आले असता बोलत होते. याप्रसंगी लाक्षणिक उपोषणास पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील नेते तसेच दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, टाकळीवाडी, घोसरवाड, हेरवाड, सैनिक टाकळी, सांगाव, कागल, सुळकूड आदी गावाबरोबर कर्नाटकातील बोरगाव, मलिकवाड, एकसंबा या गावातील सरपंच प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले की, इचलकरंजी पाणी प्रश्न हा दोन चार वर्षाचा नाही इचलकरंजीला सर्वोत्तम उपाय पंचगंगा प्रदूषण मुक्त करणे, हा आहे. पंचगंगेच्या प्रदूषणामुळे केवळ इचलकरंजीकरांचेच नाही, तर पंचगंगा नदी काठाच्या अनेक गावातील नागरिककांचे आरोग्य व शेती धोक्यात आली आहे.
यावेळी अॅडव्होकेट सुशांत पाटील, आंदोलन अंकुशचे धनाजी चिडमुंगे, नायब तहसीलदार योगेश जमदाडे, मंडळ अधिकारी बी. एस. खोत, तलाठी इकबाल मुजावर, ग्रामसेवक संतोष चव्हाण, भवानीसिंग घोरपडे, पं समिती सदस्य मिनाज जमादार, महेंद्र बागे, आधीसह दतवाड कृती समितीचे सरपंच चंद्रकांत कांबळे, बबन चौगुले, राजगोंडा पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सुरेश पाटील, नूर काले, पोलीस पाटील संजय पाटील आदीसह महिला व शेतकरी उपस्थित होते.
सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चंद्रशेखर कलगी यांनी सूत्रसंचालन तर ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांनी शेवटी आभार मानले.
हेही वाचा