सुळकूड योजनेला पूर्ण ताकदीनिशी विरोध करण्याचा दत्तवाड गाव सभेत निर्धार | पुढारी

सुळकूड योजनेला पूर्ण ताकदीनिशी विरोध करण्याचा दत्तवाड गाव सभेत निर्धार

दत्तवाड (जि. काेल्‍हापूर) : पुढारी वृत्तसेवा 

इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीवरील सुळकूड येथून मंजूर झालेल्या पाणी योजनेविरोधात लढा देण्याचा एकमुखी ठराव दत्तवाड गाव सभेत घेण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सुळकुड योजनेचा निषेधासाठी दत्तवाड येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आज बंदचे आवाहन करण्‍यात आले हाेते. याला प्रतिसाद देत ग्रामस्‍थांनी कडकडीत बंद पाळला. ग्रामसभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्‍थित हाेते. सुळकुड योजना ही दूधगंगा नदीकाठाला दुष्काळाला आमंत्रण देणारी असून ही योजना कोणत्याही परिस्थितीत कार्यान्वित करू देणार नाही, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

पूर्ण ताकतीनिशी एकत्रित लढण्याचा निर्धार

या योजनेविरोधात गट-तट, राजकारण बाजूला ठेवून पूर्ण ताकतीनिशी एकत्रित लढण्याचा निर्धार करण्यात आला. यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीच्‍या अध्यक्षस्‍थानी सरपंच चंद्रकांत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी माजी सरपंच अण्णाप्पा सिद्धनाळे, तर खजिनदारपदी सुरेश पाटील, सचिव म्हणून भैया चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


सुळकूड येथील दूधगंगा नदीवरील नवीन पुलावर सोमवारी ( दि . 28 )  मोर्चाचे आयाोजन केले आहे. या मार्चाला मोठ्या संख्येने उपस्‍थित राहण्‍याचा निर्धार दत्तवाडमधील ग्रामस्‍थांनी केला आहे.  ग्रामपंचायतीच्या वतीने सुळकुडला जाण्यासाठी सोमवार सकाळी ९ वाजता गांधी चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button