कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : परराज्यांतील ब्रँडचे आक्रमण थोपविण्याची ताकद कोल्हापूरच्या दूध उत्पादक शेतकरी आणि गोकुळमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा दुधाचा ब्रँड गोकुळ बनू शकतो, असे उद्गार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. गोकुळच्या नवी मुंबईतील वाशी येथील विस्तारीकरण व नवीन दुग्धशाळेचे उद्घाटन ना. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. आ. सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
ना. मुश्रीफ म्हणाले, गुणवत्तेमुळे गोकुळने मुंबईच्या बाजारपेठेत आपले स्थान कायम ठेवले आहे. अमूलचे आव्हान असले तरी, परराज्यांतील ब्रँडचे आक्रमण थोपविण्याची ताकद कोल्हापूरच्या दूध उत्पादकांत व धमक गोकुळमध्ये आहे.
या विस्तारीकरणामुळे गोकुळच्या खर्चात मोठी बचत होईल. सध्या 14 लाख लिटरहून अधिक दुधाची विक्री होते. भविष्यात ती वीस लाख लिटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
'गोकुळ' महाराष्ट्राचा ब्रँड व्हावा
गोकुळ हा महाराष्ट्राचा ब्रँड व्हावा, यासाठी गेली अनेक वर्षे आम्ही प्रयत्नशील आहोत. अमूलला टक्कर देण्याची क्षमता फक्त गोकुळमध्ये आहे. मुंबईत आणखी 10 लाख लिटर दूध विक्री होऊ शकते. मुंबईतील दुग्धशाळेमुळे 12 लाखांपर्यंत पॅकेजिंग क्षमता उपलब्ध झाली असल्याचे आ. सतेज पाटील यांनी सांगितले.
अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, दुग्धशाळेची क्षमता प्रतिदिन 4 लाख लिटर असताना सध्या प्रतिदिन 5 लाख 25 हजार लिटर दुधाचे पॅकिंग व वितरण केले जाते. वाशीतील नव्या यंत्रणेमुळे दरदिवशी 10 लाख लिटर दुधाचे पॅकिंग करणे शक्य होणार आहे.
ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास अभिजीत तायशेटे, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, नवी मुंबई (वाशी) व्यवस्थापक दयानंद पाटील आदी उपस्थित होते. अजित नरके यांनी आभार मानले.
वर्षाला होणार बारा कोटींची बचत
विस्तारीकरणामुळे पॅकिंगसाठी प्रतिलिटर 1 रुपये 39 पैशाची कायमस्वरूपी बचत होणार आहे, त्यामुळे गोकुळची वर्षाला 12 कोटींची बचत होणार असल्याचे गोकुळचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.