कोल्हापूर : इथेनॉल निर्मिती शेतकरी, कारखान्यांना लाभदायक | पुढारी

कोल्हापूर : इथेनॉल निर्मिती शेतकरी, कारखान्यांना लाभदायक

डी. बी. चव्हाण

कोल्हापूर :  इथेनॉल उद्योगाला केंद्राकडून मदतीची घोषणा केंद्रीय सहकार मंत्र्यांनी नुकतीच केली. यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांसह कारखान्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. यासाठी इथेनॉल प्रकल्पांना भागभांडवलाची गरज आहे. जैव इंधनात इथेनॉलचा समावेश होतो. पर्यायी इंधन म्हणून याचा वापर होत असल्याने आपणास इंधनांच्या आयातीवर अवलंबून राहावे लागत होते. आता ते करावे लागणार नाही. स्वच्छ पर्यावरणपूरक असे हे इंधन यातून मिळत आहे. यातून शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्न आणि रोजगाराचे साधन निर्माण होत आहे.

पेट्रोलची आयात कमी व्हावी, तसेच पर्यावरणही वाचले पाहिजे, यासाठी पेट्रोलमध्ये टप्प्याने इथेनॉलचे मिश्रण करणे सुरू केले आहे. 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 25 टक्के इथेनॉल मिक्स करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी इथेनॉल निर्मिती वाढली पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने या उद्योगाला अधिक मदत करणार असल्याचे केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे.
या घोषणेमुळे साखर उद्योगाला संजीवनी मिळणार आहे. यामुळे पुढील वर्षी नवीन 40 राज्यांत तब्बल 160 पेक्षा अधिक कारखान्यांतून सुमारे चारशे कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हेच इंधन साखर उद्योगाचे संकटमोचक ठरण्याचे चिन्ह आहे.

राज्यात 264 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची क्षमता असली, तरी गेल्या हंगामात राज्यात 206 कोटी लिटरची निर्मिती झाली. यासाठी वीस लाख मे. टन उसाचा वापर झाला. कोल्हापूर विभागातील 11 साखर कारखान्यांमधून 33 कोटी 19 हजार लिटर इथेनॉल निर्मिती झाली आहे. इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी कारखान्यांना 40 ते 50 कोटीपेक्षा अधिक खर्च येतो. राज्यातील 199 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम या आठवड्यात संपला. त्यामध्ये तब्बल 1320.31 लाख मे. टन उसाचे गाळप होऊन 137 लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले. शेतकर्‍यांना सुमारे चाळीस हजार कोटी एफआरपी मिळाली. यामध्ये 32 हजार कोटी साखर विक्रीतून, तर आठ हजार कोटी रुपये इथेनॉल विक्रीतून कारखान्यांना मिळाले.

राज्यात 300 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट

अतिरिक्त साखर उत्पादित झाल्यास त्याचे काय करायचे हा प्रश्न कारखान्यांसमोर होता; पण इथेनॉल निर्मितीने आता हा प्रश्न सुटला आहे. येत्या हंगामात राज्यात 300 कोटी, तर देशात 800 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्राने सहा टक्के व्याज अनुदानाची योजना यासाठी आणल्याने यंदा इथेनॉल निर्मिती करण्यासाठी कारखाने अधिक प्रमाणात तयार होणार आहेत. हे इंधनच पुढील हंगामातही या उद्योगाचे तारणहार ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील साखर उद्योग

एकूण साखर कारखाने ……………………………………………… 199
इथेनॉल निर्मिती करणारे कारखाने ……………………………. 112
इथेनॉल निर्मिती …………………………………….. 206 कोटी लिटर
इथेनॉल विक्री …………………………………….. 7816 कोटी रुपये

Back to top button