यंत्रमाग कामगाराची पंचगंगेत उडी | पुढारी

यंत्रमाग कामगाराची पंचगंगेत उडी

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : घरगुती वादातून यंत्रमाग कामगार विनोद शब्बीर शिकलगार (वय 29, रा. यड्राव फाटा परिसर) याने पंचगंगा नदीपात्रात मोठ्या पुलावरून उडी मारली. दरम्यान, महापालिका आपत्कालीन पथकाकडून तातडीने शिकलगार याचा शोध सुरू करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच विनोद याच्या पत्नीनेही नदीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु नातेवाईकांनी सतर्कता दाखवत तिला पकडले. त्यामुळे अनर्थ टळला. घरगुती वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.

यड्राव फाटा परिसरात विनोद शिकलगार कुटुंबीयांसह राहण्यास आहे. मंगळवारी सकाळी विनोद आपला पुतण्या गणेश याला मोटारसायकलवरून घेऊन पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावर आला. पुलावर मध्यभागी मोटारसायकल थांबवून त्याने बहिणीला फोन लावला आणि मोबाईल गणेशकडे दिला. गणेश फोनवर बोलत असतानाच विनोदने पुलावरून थेट नदीत उडी मारली. त्यामुळे गणेशने आरडाओरडा सुरू केला. घटनास्थळी नागरिक जमा झाले. परंतु विनोद प्रवाहात वाहून गेला. या घटनेनंतर विनोदची पत्नी तसेच नातेवाईक घटनास्थळी आले. यावेळी विनोदच्या पत्नीनेही नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु नातेवाईकांनी प्रसंगावधान राखत तिला रोखले.

महापालिकेच्या आपत्कालीन पथकाकडून विनोद याचा शोध घेण्याची सुरू असलेली मोहीम रात्र झाल्याने थांबविण्यात आली. बुधवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

 

Back to top button