कोल्हापूर : बहिरेवाडीतील ए. एस. ट्रेडर्सच्या दोन फरार संचालकांना अटक | पुढारी

कोल्हापूर : बहिरेवाडीतील ए. एस. ट्रेडर्सच्या दोन फरार संचालकांना अटक

कोल्हापूर/वारणानगर; पुढारी वृत्तसेवा : मोठ्या परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या दोन फरार संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी जेरबंद केले. बाबासाहेब भूपाल धनगर (वय 30) आणि बाळासाहेब कृष्णात धनगर (55, दोघेही रा. बहिरेवाडी, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. बाबासाहेब धनगरला नांदेड येथून तर त्याचा चुलत भाऊ बाळासाहेब धनगरला बहिरेवाडी येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे.

संशयित बाबासाहेबला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. बाळासाहेबला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे आर्थिक गुन्हे शाखेतून सांगण्यात आले.

कमी कालावधीत दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह संलग्न कंपन्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यातील लाखांवर अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार, बाबू किसन हजारे, विजय जोतिराम पाटीलसह 28 जणांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा यापूर्वीच दाखल करण्यात आला आहे.

ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीने गुंतवणूकदारांच्या केलेल्या फसवणूकप्रकरणी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दखल घेत फरारी संशयितांविरुद्ध कठोर कारवाईच्या आर्थिक गुन्हे शाखेला सूचना दिल्याने तपास अधिकार्‍यांनी तपासाची व्याप्ती वाढविली आहे.

नांदेड जिल्ह्यातील वजिराबाद पोलिस ठाण्यात ए. एस. ट्रेडर्सच्या संचालकांविरुद्ध जानेवारी 2023 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. वजिराबाद पोलिस ठाण्याचे पथक संशयितांच्या मागावर होते. त्यापैकी संशयित बाबासाहेब धनगरला नांदेड पोलिसांनी आठवड्यापूर्वी अटक केली होती. कोल्हापूर येथील फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने कोल्हापूर आर्थिक गुन्हे शाखेने त्याचा सोमवारी (दि. 7) रात्री नांदेड पोलिसांकडून ताबा घेतला.

दरम्यान, आणखी एक संशयित बाळासाहेब धनगर याचे बहिरेवाडी येथील घरात वास्तव्य असल्याची माहिती मिळताच पथकाने त्यास मंगळवारी अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी सांगितले. फरार संचालकांना अटक झाल्याने फसवणुकीची व्याप्ती चव्हाट्यावर येईल, असेही तपास अधिकार्‍यांनी सांगितले.

दोन आलिशान मोटारी, बुलेट जप्त

संशयित बाळासाहेब धनगर याच्या बाबू पार्क येथील आलिशान बंगल्यावर सायंकाळी 4 च्या सुमारास छापा टाकून पथकाने कागदपत्रांची तपासणी केली. बँक खाती तपासली असता मोठी माया जमवल्याचे स्पष्ट झाले. पथकाने दोन आलिशान चारचाकी मोटारी व एक बुलेट जप्त केली. रात्री उशिरापर्यंत त्याच्या बंगल्याची झाडाझडती सुरूच होती.

कंपनी बंद पडली आणि…

बाळासो धनगर हा कोडोली येथील एका कंपनीत कामास होता. ती कंपनी दहा वर्षापूर्वी बंद पडल्यानंतर तो या व्यवसायाकडे वळला. त्यानंतर तो ए.एस. ट्रेडर्स व त्याच्या संलग्न कंपन्यांत काम करू लागला. तो 10 वर्षांपासून बाबू पार्क, बहिरेवाडी येथे आलिशान बंगल्यात वास्तव्यास आहे. पन्हाळा तालुक्यात या दोन धनगर बंधूंचा मोठा संपर्क असल्याने फसवणुकीचा आकडा मोठा असल्याचे तपास अधिकारी स्वाती गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Back to top button