Germany Gang : ‘जर्मनी गँग’ पोलिसांना डोईजड

Germany Gang : ‘जर्मनी गँग’ पोलिसांना डोईजड
Published on
Updated on

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : रिअल इस्टेट व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड, सोन्याचे दागिने लुटण्याचा जर्मनी गँगचा आणखीन एक दहशतीचा प्रकार उघडकीस आल्यामुळे पाचवेळा 'मोका'सारखी कारवाई करूनही जर्मनी गँगची दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे. जर्मनी गँगचे कारनामे वाढत असल्यामुळे जर्मनी गँग पोलिसांना डोईजड झाल्याचे चित्र शहरात आहे. जर्मनी गँगसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या कारनाम्यांमुळे शहरातील समाजस्वास्थ्यावर त्याचा परिणाम होत आहे.

वस्त्रनगरीत गुन्हेगारी नियंत्रणाचा दावा केला जात असला, तरी शहापूर रस्त्यावर खासगी सावकाराची लुबाडणूक झाल्याच्या घटनेनंतर शहरातील क्राईम रेट पुन्हा वाढत चालल्याचे चित्र आहे. खून, खुनीहल्ला, व्यापार्‍यांवर हल्ला, लुबाडणूक, घरफोड्या, चोर्‍या, चेनस्नॅचिंग, वाहनांमधील रक्कम लांबवणे आदी खुलेआम गुन्हे करीत जणू पोलिसांना आव्हान दिले जात आहे. शहरात 22 टोळ्यांवर 'मोका'सारखी कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात असले, तरी गुन्हेगारांच्या बिनधास्त कारवायांमुळे शहरवासीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांकडून गांजासह अमली पदार्थांच्या नशेबाजीला आळा घालण्यात अपयश येत असल्यामुळे गुन्हेगारीत भर पडत आहे.

पाच-पाचवेळा 'मोका'ची कारवाई करूनही जर्मनी गँगसारख्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे कारनामे सुरूच आहेत. विशेषत:, जवाहरनगर, कबनूर, खंजिरे औद्योगिक वसाहत परिसरात याचा अधिकच त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. अनेक उद्योजक मुकाटपणे खंडणीसारखा त्रास जीवाच्या भीतीपायी सोसत आहेत. गुन्हेगारीचा बीमोड करण्याऐवजी गुन्हेगारांबरोबर काही पोलिसांचे मिटवामिटवीचे वाढत असलेले प्रकार नवीन गुन्हेगारीला बळ देत आहेत. अधिकार्‍यांनी क्राईम रेट रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

पोलिसांची दहशत कधी निर्माण होणार?

इचलकरंजीत गुन्हेगारी रोखण्यासाठी यापूर्वी काही अधिकार्‍यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी 'खाकी'चा धाक दाखवला. त्यामुळे गुन्हेगारांच्या मनात पोलिसांची दहशत निर्माण झाली होती. याच्या चर्चा आजही होतात. अनेक मोठ्या टोळ्यांच्या म्होरक्यांना कारागृहात धाडण्यासह गुन्हेगारीचा बीमोड करण्यात यश आले होते. मात्र, यामध्ये सातत्य नसल्यामुळे गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. खाकीचा धाक निर्माण करण्यासाठी अधिकार्‍यांनी 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये येऊन पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

अवैध व्यवसायालाही चाप लागेना

गुन्हेगारीचे उगमस्थान अवैध व्यवसाय आहेत. शहरातील मोठ्या टोळ्यांवर 'मोका'ची कारवाई करताना अनेक बड्या अवैध व्यावसायिकांवरही 'मोका'ची कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील अवैध व्यवसायांनाही काही प्रमाणात चाप लागला होता. मात्र, पुन्हा शहरातील अवैध व्यवसायांनी डोके वर काढले आहे. पोलिसांकडून कारवाई होत असली, तरी त्यामध्ये सातत्य नाही. अनेकवेळा कारवाया फार्सच ठरत आहेत. अवैध व्यावसायिक व पोलिसांची जवळीक शहरवासीय पुन्हा अनुभवू लागल्यामुळे अवैध व्यवसायांबरोबरच गुन्हेगारी फोफावत चालली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news