

कोल्हापूर : कामगार मिळत नाहीत, त्यात दराची घसरण, क्षुल्लक कारणावरून सौदे बंद पडणे, गुळाच्या वजनात होणारी घट, वाढलेला उत्पादन खर्च यासह विविध कारणांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ उत्पादक अडचणीत आला आहे. एका आदणामागे 9000 ते 9400 रुपये खर्च होत असताना मिळणारे उत्पन्न 6,600 ते 7,040 रुपये इतके आहे. म्हणजेच एका आदणामागे हजार ते दीड हजार रुपयांचे नुकसान सहन करून गुर्हाळे चालवावी लागत असल्याने गूळ उत्पादक अस्वस्थ आहेत.
उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बिघडत चालल्याने काही वर्षांपासून कोल्हापूरची ओळख असणारा गूळ उद्योग अडचणीत आला आहे. 1200 गुर्हाळघरे असणार्या जिल्ह्यात आता केवळ 100 गुर्हाळघरांतून गुळाचे उत्पादन घेतले जात आहे.
यामुळे वर्षाला गूळ मार्केटमध्ये सौद्याला दीड ते पावणे दोन लाख गूळ रव्यांची घट होत आहे.
चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात 250 च्या आसपास गुर्हाळे सुरू होती. यातील सुमारे 150 गुर्हाळघरे बंद पडली आहेत. मजुरांची कमतरता असतानाही प्रसंगी नुकसान सहन करून उर्वरित गुर्हाळघरे चालविली जात आहेत. त्यामुळे साहजिकच दराचीही अपेक्षा वाढली आहे. हंगाम संपत आला की, दराची वाढ होते; पण हंगामात मात्र 3500 ते 3700 च्या पुढे दर जात नाही. यामुळे गुर्हाळ मालकांसमोर मोठा प्रश्न उभा राहत आहे.
किमान 4,200 रुपये भाव मिळणे आवश्यक
उसाच्या कमी उपलब्धतेमुळे आधीच हंगाम जास्त दिवस चालणार नाही, अशी चिंता असताना आता दरही कमी होत असल्याने उत्पादक अडचणीत आहे. किमान 4 हजार 200 रुपये हमीभाव मिळाल्याशिवाय या अडचणीतून बाहेर पडणे शक्य नाही.
साखरेच्या दरावर ठरतो गुळाचा दर
साखरेचे घाऊक दर आता 3200 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत आहेत; पण हेच दर कायम राहत नाहीत. दर कमी झाल्यानंतर साखरेला मागणी वाढते. त्यामुळे गुळाची मागणीही कमी होतेे. या सर्वांचा परिणाम होऊन दर कमी होत आहेत, असे व्यापारी सांगत असलेले कारण मात्र गूळ उत्पादक शेतकर्यांना पटलेले नाही. दर पाडण्यासाठी ते कारण शोधत असल्याचा आरोप आहे.
उत्पादकाला मिळणारे उत्पन्न
एका आदणातून 220 किलो गूळ मिळतो. एका आदणासाठी दोन टन उस लागतो. त्याचा सरासरी दर 2900 ते 3200 रुपये प्रतिटन गृहीत धरल्यास ही किंमत 5600 ते 6400 रुपये इतकी होते. वाहतूक, मजुरी, रसायने, घाणा भाडे आदींसह 2900 रुपये लागतात. असा एका आदणासाठी 9000 ते 9400 रुपये खर्च होतो. किलोला सरासरी 30 ते 32 रुपये दर गृहीत धरल्यास 6600 ते 7040 रुपये उत्पन्न मिळते. दिवसाला पाच आदणे घेतली जातात. म्हणजेच दररोजचा तोटा होत आहे. शासनाने गुळाला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.