

परिते (ता. करवीर) गावाजवळ बिबट्याचे चौथ्या दिवशीही वास्तव्य कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. माळ परिसरातील काही झाडावर आतड्यासह मांसाचे तुकडे आढळून आल्याने या परिसरात बिबट्याचा वावर अद्यापही असल्याची भिती आहे. रेस्क्यू टीमने बसविलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामधून नेमका वावर कुठे आहे? हे समजणार असून या परिसरात शेतकऱ्यांनी जाणे टाळले आहे.
चार दिवसांपूर्वी एका पिग्मी एजंटला रात्री दहाच्या दरम्यान परिते पाटबंधारे कार्यालयाजवळ दोन झेपेत रस्ता ओलांडलेला वाघ सदृष्य प्राणी दिसला होता, त्यानंतर वनविभागाने पाहाणी केल्यानंतर हा वाघ नव्हे तर बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले होते. या बिबट्याने या परिसरात मोरांची शिकार केल्याचेही निदर्शनास आले होते.
या बिबट्याच्या शोधासाठी रेस्क्यू टीमने ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. परंतु आज सकाळी कारंडे नाळवा परिसरात झाडावर मांसाचे तुकडे, आतडी लटकत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले, तर काही ठिकाणी पायसर आढळल्याचे समजते.
त्यामुळे चौथ्या दिवशीही बिबट्याचा वावर याठिकाणी कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. माळ परिसरात पन्नासहून अधिक गोठे, घरे आहेत. चार दिवसांपासून या परिसरात शेतीकामासाठी भितीमुळे कुणीही फिरकलेले नाही. भातकापणीसह, ऊसतोडणी, शेतास पाणी पाजणे आदी कामे खोळंबली आहेत. त्यामुळे वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.