पेट्रोल : इथे अवघ्या पन्‍नास रुपयांत करा कारची टाकी फुल्‍ल | पुढारी

पेट्रोल : इथे अवघ्या पन्‍नास रुपयांत करा कारची टाकी फुल्‍ल

वॉशिंग्टन : जगभरात सद्यस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडू लागले आहेत. इंधन दरात रोज वाढ होत आहे. भारतात तर पेट्रोलने शंभरी कधीच पार केली असून सव्वाशे रुपयांच्या दिशेने ते वाटचाल करत आहे. जगभरात इंधन दर भडकल्याने अन्य वस्तूंच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. यामुळे तमाम जनतेचे बजेट कोलमडू लागले आहे. असे असले, तरी काही देशांमध्ये पेट्रोल अत्यंत स्वस्तही मिळतेय बरं का!

इंटरनॅशनल साईट ‘ग्लोबल पेट्रोल प्राईस डॉट कॉम’च्या माहितीनुसार सर्वात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये मिळू लागले आहे. तेथे एक लिटरला 2.56 डॉलर म्हणजे सुमारे 192 रुपये (सप्टेंबरमधील दर) आहे. नेदरलँडमध्ये हाच दर 163 रुपये इतका आहे, तसेच सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक 160 रुपये इतका आहे. याशिवाय इस्रायल, नॉर्वे, ग्रीस, फिनलँड, डेन्मार्क, आईसलँडमध्ये पेट्रोलच्या किमती वाढतच आहेत.

जगभरात इंधनाचे दर वाढत असले, तरी दक्षिण अमेरिकन देश असलेल्या व्हेनेजुएलामध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल मिळते. तेथे एक लिटर पेट्रोल 0.02 डॉलरला मिळते. म्हणजे भारतीय चलनात हा दर केवळ दीड रुपये. तुमच्या कारची टाकी 30 लिटर क्षमतेची असेल, तर व्हेनेजुएलामध्ये ही टाकी फुल्ल करण्यासाठी 50 पेक्षाही कमी रुपये लागतील. यासाठी भारतात सुमारे 3 हजार 400 रुपये द्यावे लागतील. व्हेनेजुएलात पेट्रोल सध्या सर्वात स्वस्त दराने मिळते.

Back to top button