कोल्हापूर : कॅफे पॉईंट नव्हे, अंधार्‍या खोलीत इश्काचा अड्डा… | पुढारी

कोल्हापूर : कॅफे पॉईंट नव्हे, अंधार्‍या खोलीत इश्काचा अड्डा...

दिलीप भिसे

कोल्हापूर : उमा टॉकिज चौक अन् राजारामपुरी, नागाळा पार्कसह कसबा बावडा तसा दाटीवाटीचा परिसर. उच्चभू्रंची वसाहतच म्हणायची. निर्भया पथकासह पोलिसांनी 24 तासांत मध्यवर्ती परिसरात पाच ठिकाणी छापेमारी करून कॅफेच्या नावाखाली चालणार्‍या अश्लील चाळ्यांच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला. 24 तास वर्दळ असलेल्या चौकातील कॅफेवरील कारवाईत 19 ते 22 वयोगटातील चार प्रेमीयुगुले आढळून आली. छुप्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय अड्ड्यांपाठोपाठ मंद प्रकाशात, अंधार्‍या खोलीत बेधुंद अवस्थेत चालणार्‍या इश्काच्या बाजाराचा निर्भया पथकाने भांडाफोड केला आहे.

बड्या शहरात बोकाळलेली कॅफे पॉईंटची संस्कृती काही काळापूर्वी महामार्गासह निर्जन ठिकाणी बळावत होती. पोलिसांची नजर चुकवून चिरीमिरीद्वारे कॅफेचे प्रस्थ वाढतच राहिले. खिशात पैसा खळखळू लागल्याने अशा अड्ड्यांतून अश्लील चाळ्यांसह हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय अड्डेही सुरू झाले.

कालांतराने हे प्रस्थ उपनगरांमध्ये पसरू लागले. टप्प्याटप्प्याने शहरात शिरकाव होऊ लागला. आता तर दाटीवाटीची लोकवस्ती असलेल्या परिसरात कॅफेच्या नावाखाली असे फंडे सुरू झाले आहेत. शहरासह परिसरात ही संख्या शंभरावर पोहोचल्याची सार्वत्रिक चर्चा आहे.

निर्भया पथकाचा कारवाईचा धडाका

शहरासह परिसरातील बहुचर्चित कॅफेेंवर चालणार्‍या गैरकृत्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई आणि निर्भया पथकाच्या प्रमुख मेघा पाटील यांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर शहरासह परिसरात दोन दिवसांपासून कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. अड्ड्यांवर सापडलेल्या प्रेमीयुगुलांवर प्रतिबंधक कारवाई होत असताना अशा रॅकेटमध्ये गुरफटलेल्या आणि पडद्याआड राहून सूत्रे हाकणार्‍यांचे मुखवटे समाजासमोर येण्याची गरज आहे. त्याशिवाय अशा अड्ड्यांना चाप बसणार नाही.

मंद दिव्याच्या अरुंद खोलीत सुविधा

कॅफे म्हणजे मिटिंग पॉईंट, असेच अड्ड्याचे गोंडस नाव. अत्यंत अरुंद केबिन. कमी जागेत टेबलावर केवळ दोनच व्यक्तींच्या बैठकीची व्यवस्था. मंद प्रकाश. बाजूला काळ्या रंगाचा पडदा. तासाला तीनशेपासून हजारपर्यंत भाडे. नाश्त्यासह मागेल ती सुविधा. पूर्णत: एकांतवास. केबिन बुकिंगसाठी अ‍ॅडव्हान्स नोंदणीची सक्ती. ना ओळखपत्र, ना रजिस्टर नोंदणी. सीसीटीव्हीचा पत्ताच नसतो. कोणीही यावे. मनसोक्त एन्जॉय करावा, अशीच काहीशी स्थिती!

1 जानेवारी ते 31 जुलै 2023 काळात निर्भया पथकाची कारवाई 

शहर, उपनगर कॅफेवर छापा 07
सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी,
कॉलेज परिसरात असभ्य वर्तन 917
बेदरकार वाहन चालवणे 432
दंडात्मक कारवाई 2,78,300
संवेदनशील ठिकाणे 713

Back to top button