तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यात चर्चा | पुढारी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यात चर्चा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची निवासस्थानी भेट घेतली. राव आणि डॉ. जाधव यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी दैनिक ‘पुढारी’चे समूह संपादक व ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव, राजवीर जाधव उपस्थित होते.

कोल्हापूर व सांगली जिल्हा दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री राव यांनी डॉ. जाधव यांच्या इंदिरा निवास या निवासस्थानी येऊन भेट घेतली. गेल्या दहा वर्षांत तेलंगणा राज्याचा झालेला विकास, सर्वांच्या हितासाठी घेतलेले विविध निर्णय, राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आदींची माहिती राव यांनी डॉ. जाधव यांना दिली. महाराष्ट्र हे समृद्धशील राज्य आहे. या राज्यात अनेक शहरे संपन्न आहेत. मात्र, या राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात, ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. जाधव यांनी कोल्हापूरच्या संस्कृतीची माहिती दिली. राज्यातील राजकारण, सध्याच्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय घडामोडींबाबत राव यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र हे सर्वाधिक कर देणारे राज्य आहे. विविध क्षेत्रांत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे सांगत डॉ. जाधव यांनी राव यांच्याशी विविध विषयांवर सुमारे 50 मिनिटे चर्चा केली. राज्याचा विकास, दरडोई उत्पन्न, कृषी आदी विषयांवर डॉ. योगेश जाधव यांनीही राव यांच्याशी चर्चा केली.

‘पुढारी’ परिवाराच्या वतीने राव यांचा डॉ. जाधव यांच्या हस्ते शाल, कोल्हापुरी फेटा, करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी के. वामशीधर राव, आमदार जीवन रेड्डी, माणिक कदम, बाळासाहेब देशमुख, शंकर धोंडगे, भानुदास मुरकुटे, अण्णासाहेब माने, कदीर मौलाना, कोल्हापुरातील राघवेंद्र मठाचे व्यवस्थापक रामा राव आदी उपस्थित होते.

सविस्तर चर्चा करायची आहे; लवकरच पुन्हा भेटणार

राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे, अनेक बाबी जाणून घ्यायच्या आहेत. याकरिता केवळ आपल्या भेटीसाठी कोल्हापुरात लवकरच येणार आहे. त्यावेळी वन-टू-वन सविस्तर चर्चा करू, असे मुख्यमंत्री राव यांनी डॉ. जाधव यांना आवर्जुन सांगितले. डॉ. योगेश जाधव यांना तेलंगणात येण्याचे आमंत्रणही यावेळी त्यांनी दिले.

तुमच्या कामांसाठी अभिनंदनच

“ऊस दर आंदोलन, त्यातून राज्यातील शेतकर्‍यांचा तुमच्यावर असलेला विश्वास, सियाचीनमध्ये सैनिकांसाठी बांधलेले हॉस्पिटल, राजर्षी शाहूंच्या विचार प्रसाराचे काम आदी विविध सामाजिक कार्यातील तुमच्या या सर्व कामांसाठी अभिनंदनच आहे”, अशा शब्दांत राव यांनी डॉ. जाधव यांच्या सामाजिक कामाचा गौरव केला.

Back to top button